मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोदी सरकारसोबतच गुजरात सरकारनेही खास तयारी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातच्या अहमदाबादमधून करणार आहेत. 24 फेब्रुवारीला ट्रम्प अहमदाबादमध्ये जाणार आहेत. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याच धर्तीवर भारतात ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचं आयोजन करण्याच आलं आहे. 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी गुजरातचं मोटेरा स्टेडियम तयार करण्यात आलं आहे.


बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सरदार पटेल स्टेडियमचा म्हणजेच मोटेरा स्टेडियमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासोबतच मोटेरा स्टेडियमचीही चर्चा रंगू लागली. मोटेरा स्टेडियम हे क्रिकेटचं जगातील सर्वात मोठं स्टेडियम असल्याचा दावा बीसीसीआयने केला आहे. या स्टेडियममध्ये ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांचंही भाषण होणार आहे. या स्टेडियमचं उद्घाटन डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

क्रिकेटचं सर्वात मोठं मैदान
मोटेरा स्टेडियम पूर्णत: नव्याने बांधण्यात आलं आहे. एकाच वेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात एवढी मोटेरा स्टेडियमची क्षमता आहे. मात्र या स्टेडियमचा इतिहास जुना आहे. मोटेरा स्टेडियम बनवण्यासाठी गुजरात सरकारने आधी 50 एकर जमीन दान केली होती. त्यानंतर 1982 मध्ये मोटेरा स्टेडियम बांधण्यात आलं.

1983 पासूनच मोटेरा स्टेडियमवर क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. आतापर्यंत मोटेरा स्टेडियममध्ये एक ट्वेण्टी-20, 12 कसोटी आणि 24 एकदिवसीय सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण 2015 मध्ये स्टेडियम नव्याने बांधण्यासाठी इथे क्रिकेट सामन्याचं आयोजन थांबवण्यात आलं. 750 कोटी रुपये खर्च करुन मोटेरा स्टेडियम नव्याने बांधण्यात आलं. 16 जानेवारी 2017 रोजी याचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. हे स्टेडियम तयार होण्यासाठी चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.

1 लाख 10 हजार प्रेक्षक क्षमता
हे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड आणि कोलकाताचं ईडन गार्डन्सपेक्षा प्रत्येकबाबतीत मोठं आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम होतं. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एकाच वेळी सुमारे एक लाख प्रेक्षक बसू शकतात. मात्र मोटेरा स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात, असा दावा केला जात आहे. अशाप्रकारे मोटेरा स्टेडियम क्रिकेटचं जगातील सर्वात मोठं मैदान बनलं आहे.

स्टेडियमध्ये काय खास?
हे स्टेडियम 63 एकर परिसरात बनलं आहे. लॉर्सन अँड टुब्रो आणि पापुलस या कंपन्यांनी हे स्टेडियम बांधलं आहे. या क्रिकेट स्टेडियममध्ये तीन प्रॅक्टिस ग्राऊंड आणि एक इन्डोअर क्रिकेट अकदामी आहे. मोटेरा स्टेडियममध्ये तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकीच्या पार्किंगची सोय आहे. या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रुम, एक क्लब हाऊस आणि एक ऑलिम्पिक साईजचं स्विमिंग पूल आहे.

हायटेक मोटेरा स्टेडियम
हे क्रिकेट स्टेडियम पूर्णत: हायटेक आहे. या स्टेडियममध्ये विविध प्रकारचे 11 पिच आहेत. या मैदानाचं ड्रेनेज सिस्टिमही फार चांगली आहे. पाऊस पडल्यानंतर मैदानातून केवळ अर्ध्या तासात पाणी काढण्याची व्यवस्था आहे. तसंच ड्रेसिंग रुममध्ये जिमची व्यवस्था आहे.