Ajit Pawar NDA Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. अजित पवार 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. याबाबत खुद्द अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, ''मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.'' या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या (NDA) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार पहिल्यांदाच दिल्ली दरबारी जाणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.


राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच दिल्ली दरबारी


बंडानंतर पहिल्यांदाच राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नाशिकमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांनी पंतप्रधान मोदी यांनी भेटणार असल्याची माहिती दिली आहे. दिल्लीतील एनडीएच्या (NDA) बैठकीचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या 18 जुलैच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकींवर चर्चा करण्यात येणार आहे. अजित पवार दुसऱ्यांदा दिल्ली दरबारी जाणार आहेत. यापूर्वी खातेवाटपाआधी अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली होती.


अजित पवार पंतप्रधान मोदींची घेणार भेट


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींकडे आपण शेतकऱ्यांसह राज्याचे विविध प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, ''मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीला उपस्थित राहणार आहोत.''


पाहा व्हिडीओ : एनडीएच्या बैठकीत अजित पवारांना निमंत्रण;आगामी निवडणुकांवर चर्चा



अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहेत. अर्थ आणि नियोजन खाते मिळालेल्या अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितलं की, खातेवाटपामुळे ते आणि राष्ट्रवादीचे इतर आमदार खूश आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांच्यासह नऊ आमदार 2 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले होते. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


'पंतप्रधान मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही'


अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. सरकारमध्ये असल्याशिवाय राज्यातील प्रश्न सोडविणे शक्य होणार असल्याचे सांगत पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही.' 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काय म्हणाले?


राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत अजित पवार म्हणाले की, इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणासह चार ते पाच मुद्दे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मतदान यादी तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत.


शरद पवारांबाबत काय म्हणाले अजित पवार?


नाशिकमध्ये अजित पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून शरद पवारांचा फोटो गायब होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'पवार साहेब आमचे प्रेरणास्थान, आमचे आदर्श आहेत. त्याचा फोटो माझ्या केबिनमध्ये आहे.'


अजित पवार सिल्व्हर ओकवर


शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अजित पवार प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे शासकीय निवासस्थान सिल्व्हर ओक येथे गेले.