Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात (Air India Plane Crash Ahmedabad) एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं आहे, त्या ठिकाणच्या 24 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात महाराष्ट्रातील 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या विमान अपघातात पनवेल-उरण येथील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा (Maithili Patil ) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मैथिली पाटील यांच्या जाण्यानं संपूर्ण न्हावा गावात शोकाकूल
मैथिली पाटील या हवाई सुंदरी म्हणून मागील 2 वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांनी 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या देखील केल्या होत्या. त्यांच्या या जाण्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. मैथिली यांचे बाबा मोरेश्वर पाटील यांची स्थानिक आमदार महेश बालदी यांनी भेट घेत सांत्वन केले आहे. मैथिलीच्या जाण्याने आम्हाला मोठं दुःख झालं आहे. सध्या अहमदाबादला तिची आई आणि मामा गेले आहेत. संपूर्ण न्हावा गावात शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही देखील तीच शव आण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली. मैथिली पाटील यांचा विमान अपघातात मृत्यू होणं हा कुटुंबियांसाठी मोठा धक्का असल्याचे बालदी म्हणाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील मैथिली पाटील यांच्या कुटुंबांची भेट घेत सात्वंन केलं आहे.
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
