Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एआय-171 विमानाच्या भीषण अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यामध्ये १२ क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं देखील निधन झालं आहे. तर विमान कोसळलेल्या परिसरातील आणखी 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमान कोसळलेल्या परिसरातील बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या बाहेर आपल्या आईसोबत चहाचे दुकान चालवणाऱ्या 15 वर्षीय आकाश यादवचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याची आई रेखा यादव देखील गंभीर जखमी झाली आहे. सध्या रेखा यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एअर इंडिया एआय-171 विमानाच्या अपघातानंतर घडली. विमान उड्डाण केल्यानंतर काहीच वेळात मेघानी नगर भागात कोसळले, आणि त्याचे काही तुकडे थेट बी. जे. मेडिकल हॉस्टेलजवळील परिसरात येऊन पडले, जिथे आकाश आणि त्याची आई नेहमीप्रमाणे आपले चहाचे दुकान सांभाळत होते.
आकाशचा दुर्दैवी मृत्यू
अपघातानंतर क्षणातच परिसरात प्रचंड आग लागली. त्याच आगीत आकाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आई रेखा यादव यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने त्या देखील गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विमानातील एक प्रवासी बचावला
अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी जिवंत बचावल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विमानातील 11A या सीटवर बसलेले रमेश विश्वकुमार हे एकमेव प्रवासी सुदैवाने वाचले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. या भीषण दुर्घटनेविषयी सांगताना रमेश विश्वकुमार म्हणाले, "विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदांतच जोरदार आवाज यायला लागला आणि काही क्षणांतच विमान कोसळलं. हे सगळं इतकं वेगानं घडलं की कळायच्या आतच अपघात झाला," असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
