Air India Plane Crash : पायलटनं जाणीवपूर्वक विमान पाडल्याचा दावा सरकारनं खोडून काढला, एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत स्पष्टीकरण दिलं...
Air India Plane Crash Update : एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अहमदाबादमध्ये झाला होता, ज्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता.

नवी दिल्ली :गुजरातमधील अहमदाबाद येथे गेल्या वर्षी एअर इंडियाचं विमान AI-171 दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्या दुर्घटनेत 260 जणांचा मृत्यू झाला होता. काही विदेशी माध्यमांनी पायलटनं जाणीवपूर्वक इंधनाचा स्वीच ऑफ केल्याचा दावा करणारं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. ते वृत्त सरकारनं फेटाळलं आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरु केली होती. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोनं प्रसिद्धीपत्रक जारी करुन त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
AAIB नं काय म्हटलं?
AAIB नं जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या प्रकरणी कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. विमान दुर्घटनेसंदर्भात अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य नसल्याचं एएआयबीनं म्हटलं आहे.
AAIB नं म्हटलं की काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली. मात्र, त्या बातम्या चुकीच्या असून अफवांवर आधारित आहेत. लोकांना आवाहन करण्यात येतं की या गंभीर प्रकरणात फक्त अधिकृत प्रसिद्धीपत्रक, तपासाचा अंतिम रिपोर्ट समोर येण्याची वाट पाहावी.
सर्व तथ्य तपासणार - AAIB
AAIB नं म्हटलं की अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणाची चौकशी व्यावसायिकपणे किंवा पूर्ण पारदर्शकतेनं केली जात आहे.या प्रकरणातील सर्व तथ्य तपासली जात आहेत. सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर अंतिम रिपोर्ट जारी केला जाईल. विमान दुर्घटनेची चौकशी ही कॉम्प्लेक्स आणि टेक्निकल प्रक्रिया आहे. यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा रिव्यू, टेक्निकल इंस्पेक्शन, हवामानची स्थिती यासह इतर पैलूंवर सखोल पणे चौकशी केली जात आहे. यामुळं चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईचं ठरेल, असं एएआयबीनं म्हटलं.
दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबाबत अंतिम चौकशी अहवाल कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

























