नवी दिल्ली : भारतीय विमान कंपन्या विविध कारणांमुळं सातत्यानं चर्चेत असतात. एअर इंडिया देखील एका प्रकरणामुळं चर्चेत आलं आहे. एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्लीतून 19 मार्चला कॅनडाला जाण्यासाठी निघालं. हे विमान चार तास प्रवास करत चीनपर्यंत पोहोचल्यानंतर ते माघारी वळवून दिल्लीला आणण्यात आलं. यासर्व प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  

Continues below advertisement

Air India : एअर इंडियाचं विमान चीनमधून परत का फिरवलं? 

नवी दिल्लीतून कॅनडाच्या व्हँकूव्हरला जाणारं विमान एअर इंडियाला चीनमधून पुन्हा दिल्लीत आणावं लागलं. याचं कारण कॅनडाचा एक नियम आहे. एअर इंडियाचं जे विमान कॅनडाला निघालेलं होतं ते  बोईंग-777 200 LR हे होतं. मात्र कॅनडामध्ये या विमानाच्या वापरास परवानगी नाही. एअर इंडियानं नवी दिल्लीहून व्हँकूव्हरला पाठवलेल्या विमानाचं कॅनडामध्ये लँडिंग करता येणार नव्हतं. ही बाब एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येई पर्यंत विमान चीनच्या एअरस्पेसमध्ये पोहोचलं होतं. 

कॅनडामध्ये बोईंग 777-300 ईआरच्या वापरास परवानगी आहे. कॅनडात बोईंग 777-200  लाँग रेंज या विमानाला परवानगी नाही. मात्र, एअर इंडियाकडून गुरुवारी दिल्लीहून व्हँकूव्हरला पाठवण्यात आलेलं विमान बोईंग 777-200 लाँग रेंज होतं. या विमानात प्रवासी देखील होते. मात्र, या विमानाला कॅनडात प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. एअर इंडियाचं विमान दिल्लीतून उड्डाण घेतल्यानंतर चार तासात चीनच्या एअर स्पेसमध्ये कुन्मिंगपर्यंत पोहोचलं होतं. त्यावेळी मोठी चूक झाल्याचं एअर इंडियाच्या लक्षात आलं. गुरुवारी विमानानं सकाळी 11.34 व्हँकूव्हरसाठी दिल्लीतून निघालं. यानंतर विमान सायंकाळी 7.19 मिनिटांनी दिल्लीत पुन्हा पोहोचलं.

Continues below advertisement

वेगवेगळ्या देशांमध्ये विदेशी विमानांसाठी वेगवेगळे नियम केलेल असतात. काही देशांमध्ये एअरलाईन्स, काही देशांमध्ये विमानाचं मॉडेल यानुसार परवानगी दिलेली असते. एअर इंडियाच्या प्रकरणात बोईंग -777 300 ई आरला परावनगी होती आणि बोईंग 777-200 लाँग रेंजला परवानगी नव्हती. 

एअर इंडियाकडून या घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांविरद्ध एअर इंडियाकडून कठोर  पावलं उचलण्यात आली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियानं म्हटलं की आम्हाला आमची चूक लक्षात आली असून आम्ही ही चूक पुन्हा होऊ देणार नाही. आमची चूक लक्षात आली तेव्हा विमान दिल्लीला परत बोलावलं, असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.  

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी एआय 185 विमान दिल्लीतून कॅनडाच्या व्हँकूव्हरला जाणार होतं. मात्र ऑपरेशनल अडचणींमुळं ते माघारी बोलावण्यात आलं. दिल्ली विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं, असंही त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं हवाई इंधनाच्या दरात वाढ झालेली असताना एअर इंडियाला मात्र ऑपरेशनल चुकीमुळं मोठं नुकसान सहन करावं लागलं.