Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर भागात कोसळले आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. या विमान अपघातानंतर आकाशात सर्वत्र धूरच धूर पसरलेला दिसत आहे. या अपघातात किती जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जेव्हा एखादे विमान कोसळते, तेव्हा त्यानंतर सर्वात पहिले ब्लॅक बॉक्स शोधले जाते. जाणून घेऊयात नेमकं काय असतं ब्लॅक बॉक्स? 

Continues below advertisement


जेव्हा कोणत्याही प्रकारचा विमान अपघात होतो, तेव्हा सर्वात आधी त्या विमानाच्या अपघाताचे कारण काय होते हे शोधले जाते. यासाठी संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन केले जाते. विमान कोसळताच लगेचच तेथे स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल होतात. 


ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?


सर्वात पहिले विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रेकॉर्डिंग डिव्हाइस असते, ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केले जाते. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. 


ब्लॅक बॉक्स कोण शोधतं?


विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट ठरते. विमान अपघातानंतर त्याच्या तपासासाठी खास प्रशिक्षण दिलेली एअर क्रॅश तपासणी टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम करते. विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या वतीने या टीम्स पाठवण्यात येतात. यामध्ये अनेक वेळा नौदल किंवा विशेष बचाव पथक देखील सहकार्य करते.


ब्लॅक बॉक्स कसा शोधला जातो?


विमान अपघातात जेव्हा संपूर्ण विमान पूर्णपणे नष्ट होते, अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो, असा प्रश्न अनेकांना उपस्थित होतो. ब्लॅक बॉक्सला काहीच का होत नाही? याचे कारण म्हणजे तो टायटॅनियमपासून बनवलेला असतो, त्यामुळे ब्लॅक बॉक्स अपघाताच्या वेळी देखील सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून त्याला एका अत्यंत मजबूत बॉक्समध्ये ठेवले जाते. ब्लॅक बॉक्समध्ये विशेष प्रकारचा लोकेटर बसवलेला असतो, जो अपघातानंतर 30 दिवसांपर्यंत सतत सिग्नल पाठवत राहतो. जर विमान जमिनीवर कोसळले असेल, तर विमानाच्या अवशेषांना हटवून हा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. जर अपघात पाण्यात झाला असेल तरीदेखील हा बॉक्स सिग्नल पाठवत राहतो.



आणखी वाचा


Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!