Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले यामध्ये अनेक जण दगावल्याची भीती वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार,  या विमानाच्या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांत एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात 169 भारतीय होते. याशिवाय 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन, 1 पोर्तुगीज प्रवासी होते. या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. विमानात 242 लोक होते, ज्यात 2 मुलांसह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झालं. मात्र, त्या ठिकाणी फक्त मृतदेहांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. 

गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 100हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप या संपूर्ण घटनेवर अधिकृत आकडेवारी स्पष्ट झालेली नाही. लंडनकडे निघालेलं हे विमान टेकऑफनंतर काही वेळातच अहमदाबादच्या रहिवासी भागात कोसळलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमानाने एका इमारतीला धडक दिली, आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला. विमान पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून, आकाशात धुराचे मोठ-मोठे लोट आणि मलबा सर्वत्र पसरला आहे. बचावकार्यासाठी आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स येत राहिल्या. पण घटनास्थळी असलेलं विदारक दृश्य मन हेलावून टाकणारं आहे.

रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी

या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं असून, रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची मोठी गर्दी जमलेली आहे. काही जखमींना अतिदक्षता विभागात उपचार दिले जात आहेत. अपघातानंतरचे सीसीटीव्ही आणि मोबाइल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे भयभीत आणि दुःखी वातावरण निर्माण झालं आहे.

धावपट्टी अनिश्चित काळासाठी बंद

या दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळाची धावपट्टी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. इतर सर्व उड्डाणांना इतर विमानतळांवर वळवण्यात आले आहे.

प्रशासन सतर्क; बचावकार्य सुरू

राज्य आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणा घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. जखमींना उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पथकं बोलावण्यात आली आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. पंतप्रधान आणि इतर नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला असून, अपघाताचे तपास आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपशील आणि मृतांचा अधिकृत आकडा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.