Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताला दहा महिने उलटल्यानंतर, पीडितांच्या जवळपास 30 कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मधील माहिती जाहीर करण्याची विनंती केली आहे. कुटुंबीयांनी म्हटले आहे, "आम्हाला पैसे नकोत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की अपघात का झाला आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का." त्यांचा युक्तिवाद आहे की, जर ब्लॅक बॉक्समधील माहिती सार्वजनिक केली जाऊ शकत नसेल, तर ती किमान कुटुंबीयांना खासगीरित्या दिली जावी. 12 जून 2025 रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे बोईंग 787-8 विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळात एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या अपघातात 241 प्रवासी आणि इतर 19 प्रवाशांसह एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

वेबसाइटवर मृतांच्या वस्तूंचे स्पष्ट फोटो उपलब्ध नाहीत

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, कुटुंबीयांनी एअर इंडियावर मदतीचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.अपघातात आपल्या आईला गमावलेल्या किंजल पटेल यांनी, पीडितांच्या वस्तू ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंडियाच्या वेबसाइटचा वापर करताना येणाऱ्या अडचणींचे वर्णन केले. त्या म्हणाल्या, वेबसाइटवर 25,000 हून अधिक वस्तूंची यादी आहे, पण फोटो अस्पष्ट आहेत. काहीही शोधणे किंवा ओळखणे जवळजवळ अशक्य आहे. आपली आई, भाऊ आणि मुलगी गमावलेल्या खेडा येथील रोमिन वोरा म्हणाले की, डिजिटल साधनांच्या अभावामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आम्हाला पैशांची गरज नाही

ते म्हणाले, फक्त एकच ईमेल ॲड्रेस आहे आणि प्रतिसाद मिळायला 15 दिवसांपर्यंत वेळ लागतो. गावातील अनेकांना ईमेल कसा वापरायचा हेसुद्धा माहीत नाही. त्यांनी असेही सांगितले की, वेबसाइटवर वैयक्तिक वस्तू सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे असंवेदनशील आहे. विमान अपघातात आपल्या 24 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर निलेश पुरोहित म्हणाले, माझे घर आता पूर्णपणे रिकामे वाटते. कोणतीही भरपाई ही पोकळी भरू शकत नाही. आम्हाला पैशांची गरज नाही, आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे.

Continues below advertisement

अंतिम अहवाल यावर्षी जूनमध्ये अपेक्षित  

पीडित कुटुंबीयांनी या पत्राच्या प्रती विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही पाठवल्या आहेत. एअर इंडियाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) गेल्या वर्षी जुलैमध्ये विमान अपघातावरील आपला प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल या वर्षी जूनमध्ये, अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या सुमारास अपेक्षित आहे.

वैमानिकाला दोषी ठरवणारा अहवाल चुकीचा  

AAIB ने 12 फेब्रुवारी रोजी सांगितले की, अहमदाबाद विमान अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे. या घटनेसाठी वैमानिक जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या प्रसिद्ध इटालियन वृत्तपत्र 'कॉरिअर डेला सेरा'चा अहवाल AAIB ने चुकीचा असल्याचे फेटाळून लावला. या इटालियन वृत्तपत्राने, अज्ञात सूत्रांचा हवाला देत, असे वृत्त दिले होते की, तपासकर्त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता. उलट, वैमानिकाने जाणीवपूर्वक इंधनाचे स्विच बंद केले होते. AAIB ने म्हटले आहे, "तपास सुरू आहे. कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही." ब्युरोने प्रसारमाध्यमांना संयम बाळगण्याचे आणि घाईने अटकळ बांधणे टाळण्याचे आवाहन केले.

इतर महत्वाच्या बातम्या