नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या स्थानी मायावतींचा बसप असून काँग्रेस तिसऱ्या स्थानी आहे. भाजपची संपत्ती ही काँग्रेसपेक्षा जवळपास सातपट जास्त असल्याची माहिती ADR रिपोर्टमधून माहिती मिळाली आहे. गेल्या सात वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप संपत्तीच्या बाबतीतही अग्रस्थानी पोहोचला आहे. भाजप आणि इतर पक्षांच्या घोषित संपत्तीमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचं दिसून येत आहे. 


असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) कडून राजकीय पक्षांच्या 2019-20 वर्षातील घोषित संपत्तीचा तपशील प्रसिद्ध केला आहे. यात सात राष्ट्रीय पक्ष आणि 44 प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी देण्यात आली आहे. सात राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीचा आकडा 6988.57 कोटी रुपये इतका आहे तर प्रादेशिक पक्षांची एकूण घोषित संपत्ती 2129.38 कोटी रुपये इतकी आहे.  


2019-20 या वर्षातील भाजपची घोषित संपत्ती 4 हजार 847 कोटींची असल्याची माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे.  दुसऱ्या स्थानी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने स्थान पटकावले आहे. बहुजन समाज पक्षाची संपत्ती ही 698.33 कोटी इतकी आहे.  


तिसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसकडून 588.16 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे तर काँग्रेसला 49.55 कोटींची देणी चुकवायची आहेत, अशीही माहिती या रिपोर्टमधून मिळाली आहे. 


प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय. सपाकडे 563.47 कोटी इतकी घोषित संपत्ती आहे.  तेलंगण राष्ट्र समितीकडे (टीआरएस) घोषित संपत्ती 301.47 कोटी तर अण्णा द्रमुकची घोषित संपत्ती 267.61 कोटी इतकी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे 148.46 कोटी इतकी घोषित संपत्ती आहे. 


या एडीआर रिपोर्टमध्ये पक्षांच्या मालकीची जमीन, मालमत्ता, रोख रक्कम, बँकेतील शिल्लक, मुदत ठेवींमध्ये गुंतवलेली रक्कम, कर्ज अशा पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha