नवी दिल्ली/मुंबई:  देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल.

मात्र एबीपी माझा आणि सीएसडीएसने मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोल घेऊन, चार राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप आघाडी घेण्याची शक्यता आहे. कारण पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा अंदाज एबीपी न्यूजच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

पंजाबमध्ये मात्र भाजप आणि अकालीदलाची जोरदार पिछेहाट होताना दिसते. इथं सत्तेसाठी काँग्रेस आणि आपमध्ये रस्सीखेच बघायला मिळतेय.



उत्तर प्रदेश - एकूण जागा 403 



भाजप - 164 ते 176

सपा - 156-169

बसपा - 60 ते 72

इतर - 2 ते 6

पंजाब



एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली दल आणि भाजपला धक्का बसण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस यंदा सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. तर पहिल्यांदाच पंजाबच्या आखाड्यात उतरणाऱ्या आम आदमी पक्षाने मास्टरस्ट्रोक मारला आहे.

एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलनुसार

पंजाब (117)

अकाली दल/आघाडी - 19 ते 27

काँग्रेस - 45 ते 56

आप - 36 ते 46

कसा झाला सर्व्हे?
पंजाबमध्ये एबीपी न्यूज-सीएसडीएसने 9 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान मतदारांचं मत घेतलं. 3268 मतदारांशी बातचीत केलं. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच केला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि मुख्यमंत्री हरिश रावत यांना धक्का बसण्याचा अंदाज एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

उत्तराखंड (71)

भाजप - 34 ते 42

काँग्रेस - 23 ते 29

अन्य - 3 ते 9

कसा झाला सर्व्हे?
उत्तराखंडमध्ये एबीपी न्यूज-सीएसडीएसने 17 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत मतदारांचं मत जाणून घेतलं. 20 विधानसभा मतदारसंघातील 1859 मतदारांशी संवाद साधला. युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच हा सर्व्हे केला आहे.

गोवा


गोव्यात यंदा भाजपला सत्तेसाठी मोठी झटापट करावी लागत आहे. एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार -

गोवा - एकूण जागा 40

काँग्रेस - 10 ते 16

भाजप - 16-22

आप - 0 ते 4

MGP - 1 ते 5

कसा झाला सर्व्हे?
गोव्यात एबीपी न्यूज-सीएसडीएसने 10 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीदरम्यान मतदारांचं मत जाणून घेतलं. यादरम्यान 1748 मतदारांशी मतं नोंदवण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच केला आहे.