(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Centenary Speech : आनंदबझार आज जे मुद्दे मांडतेय ते विचार करायला लावणारे; अमर्त्य सेन यांचे संपूर्ण भाषण
Amartya Sen : फुटीरवाद्यांविरोधात आनंदबझारने आवाज उठवला आहे आणि हे समाधानकारक आहे असं नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.
कोलकाता: शंभर वर्षांपूर्वी डोल पोर्णिमेच्या दिवशी सुरू झालेलं लाल रंगाचं ते दोन पैसे किंमत असलेलं वृत्तपत्र काही आदर्शांच्या खांबावर उभं होतं, आजही त्या आदर्शांचं मूल्य किंचितही कमी झालेलं नाही, या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने याचा विचार व्हायला हवा असं मत नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. आनंदबझार पत्रिकेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
अमर्त्य सेन यांचे विचार त्यांच्याच शब्दात,
आनंदबझार पत्रिकेच्या पत्रकारिता क्षेत्रातील उदयाने द इंग्लिशमन या प्रख्यात वृत्तपत्राची चिंता वाढली. 14 मार्च 1922 रोजी द इंग्लिशमनने लिहिले की, कोलकात्यामध्ये एक वृत्तपत्र सुरू झालं असून या वृत्तपत्राची छपाई लाल कागदावर केली जाते. आनंदबझार ज्या दिवशी सुरू झाले तो दिवस खरोखरच आनंदाचा होता. मार्च महिन्यातील डोल पोर्णिमाच्या दिवशी प्रफुल्ल कुमार सरकार यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. लाल रंगाच्या कागदावर प्रकाशित होत असलेलं हे वृत्तपत्र अनेक महत्वाच्या आणि गंभीर विषयांना हात घालत होतं. या वृत्तपत्रासाठी कोणताही विषय वर्ज्य नव्हता, पण बंगाली लोकांसाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आल्याची घोषणा केली गेली.
द इंग्लिशमनने या वृत्तपत्राविषयी लिहिलं होतं की, लाल रंगात प्रकाशित होणारं वृत्तपत्र हे त्याच्या रंगाप्रमाणे धोकादायक ठरेल. पण त्याच वेळी देशातील चिंताजनक मुद्द्यांवर तातडीनं चर्चा करण्याची गरज असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं.
आता 100 वर्षानंतर काहीतरी नवीन विचार करण्याची गरज आहे का, याचा विचार करायला हवं. सन 1922 सालच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आता बरीच वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यावेळी जे काही ठरवलं होतं त्यातील अनेक गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत. पण त्याचवेळी अनेक गोष्टी अशा आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत, कमतरता आहेत की ज्या अजूनही भरुन निघाल्या नाहीत.
सन 1922 च्या दरम्यान अनेक भारतीयांना तुरुंगवास भोगावा लागला होता. माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांना राजकीय कारणांमुळे तुरुंगात जावं लागलं होतं. यापैकी काहीजण हे आनंद बझार आणि हिंदुस्थान स्टॅन्डर्डसाठी काम करायचे. या लोकांना तुरुंगात जाताना पाहणं ही दृष्यं मला आजही आठवतात, माझ्या आयुष्यातील सुरवातीच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या आठवणींपैकी या आठवणी होत्या. खासकरुन चाळीसच्या दशकातील या आठवणी होत्या.
मी त्यांना नेहमी विचारायचो, कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात पाठवण्याचा हा प्रकार कधी थांबेल का? त्यावर त्यांचं उत्तर असायचं, जोपर्यंत आपण स्वातंत्र्य होत नाही तोपर्यंत ही शक्यता नाही. नंतर देश स्वातंत्र्य झाला, तुरुंगं बदलली. पण कोणताही गुन्हा नसताना राजकीय कारणांसाठी लोकांना तुरुंगात धाडण्याचं कृत्य हे कायम राहिलं, आजही ते सर्रासपणे सुरू आहे.
काहीतरी वेगळा अन् बोल्ड विचार करणाऱ्या, राजकीयदृष्ट्या धडाडीचं काम करणाऱ्या लोकांना सरकारकडून त्रास दिला जातो. कोणत्याही खटल्याशिवाय, कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता, तथाकथित गुन्ह्यांसाठी त्यांची रवानगी तुरुंगात केली जाते.
देशाच्या बाहेरुन त्यांची अनेकदा प्रशंसा केली जाते. जसं की आपण ऐकल्याप्रमाणे, प्रो. नॉम चॉम्स्की यांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात खितपत पडलेल्या उमर खालिदचा सन्मान करायचा आहे. पण असा सन्मान या देशात दुर्मिळ बनला आहे.
आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आपण नेहमी गरिबी पाहतो, इथं आरोग्याच्या सुविधांचा अभाव आहे. सर्वसामान्य नागरिकांबद्दल कुणालाही आदर नाही, महिलांना तुच्छ वागणूक मिळते. या मुद्द्यांवर आनंदबझारने जे काही मु्द्दे मांडले आहेत ते आपल्याला विचार करायला लावणारे आहेत.
आपल्या देशातील नवीन समस्या ही आहे की आपण आपली राष्ट्रीय एकात्मता विसरत चाललो आहोत, हे सुचिंतेचा अभाव असल्याचं स्पष्ट आहे. संकुचित राजकीय हित साधण्यासाठी आपण लोकांना जात आणि धर्माच्या आधारावर विभागत आहोत. हिंदू आणि मुस्लिम ज्या ठिकाणी एकत्र काम करतात त्या ठिकाणी भेदभावाला चालना देत आहोत.
रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारताचं चित्र बदलून आपण एकतर्फी सांप्रदायिक राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपल्या देशातील नागरिक खऱ्या अर्थानं कमकुवत होत आहेत.
आनंदबझार पत्रिकेने या फुटीरवादाविरोधात आवाज उठवला आहे आणि हे समाधानकारक आहे. डोल पोर्णिमेच्या दिवशी सुरू झालेलं लाल रंगाचं ते दोन पैसे किंमत असलेलं वृत्तपत्र काही आदर्शांच्या खांबावर उभं होतं, आजही त्या आदर्शांचं मूल्य किंचितही कमी झालेलं नाही. या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने याचा विचार व्हायला हवा. द इंग्लिशमनने म्हटल्याप्रमाणे तो 'धोक्याचा सिग्नल' आजही न्याय प्रस्थापित करण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
आपल्याला आतापर्यंत अनेक संकटातून पुढे जावं लागलं आहे. त्यामुळे आपल्याला जशी आनंदाची कमतरता नको आहे तसंच अनेक समस्यांवर उपाय शोधण्यात प्रवाही असण्याची नितांत गरज आहे. कदाचित केवळ विचारातील साधेपणामुळे आपल्याला यश मिळणार नाही, आपण एका मजबूत आणि संरचित विचार प्रक्रियेवर भर दिला पाहिजे. आनंदबझार हे एका मोठ्या सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल कृतज्ञता बाळगण्यास कारण आहे.