Delhi Fire: राजधानी दिल्लीच्या विवेक विहार भागातील एका इमारतीला आज (3 मे) पहाटे भीषण आग लागली, ज्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. शोधकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.अग्निशमन कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3:47च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला (फायर कंट्रोल रूम) फोन आला. चौदा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी व आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. बचाव पथकांनी दाट धुराच्या लोटातून 12 हून अधिक लोकांना बाहेर काढले. मृतांचा आकडा आठवरून नऊ झाला असून, चार जण गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेडवरच तीन मृतदेह आढळले
पोलिसांनी सांगितले की, अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, कारण सापडलेले मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, तीन जणांचे मृतदेह त्यांच्या अंथरुणात आढळले. प्राथमिक तपासानुसार, एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत. इमारतीच्या नेमक्या कोणत्या मजल्यावर किंवा भागात आग लागली, याचा तपास सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, परंतु कुलिंगचे काम अजूनही सुरू आहे.
फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर फ्लॅटमधील रहिवासी स्वतःला वाचवण्यासाठी छतावर धावले, परंतु छताचा दरवाजा बंद असल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरही चार जण उपस्थित होते, त्यांचाही मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
