Jabalpur Cruise Accident: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी अचानक आलेल्या वादळामुळे पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटले. आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, 28जणांना वाचवण्यात आलं. अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी क्रूझवर अंदाजे 43 ते 47 पर्यटक होते. केवळ 29 जणांसाठी तिकीट काढण्यात आले होते. हा अपघात किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर झाला. क्रूझ उलटले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 74 किलोमीटर होता. बर्गी शहराचे सीएसपी अंजुल मिश्रा यांच्या माहितीनुसार, एसडीआरएफने अनेक लोकांना वाचवले, परंतु अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अतिरिक्त दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पर्यटन मंत्री धर्मेंद्र लोधी जबलपूरला पोहोचले, पण त्यांचे एक धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, "नर्मदा नदीत पेट्रोल आणि डिझेल बोटींवर बंदी आहे. मला याची माहिती नाही."
मृत्यूचे भयंकर वादळही वेगळं करू शकलं नाही
या अपघातात मरीना मेस्सी आणि तिचा चार वर्षांचा मुलगा त्रिशान यांचाही मृत्यू झाला. बचाव पथकाला आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. आईने आपल्या लाडक्या मुलाला स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये गुंडाळले होते. तिने बाळाला इतक्या घट्ट छातीशी धरले होते की मृत्यूचे भयंकर वादळही त्यांना वेगळे करू शकले नाही. जेव्हा बचाव पथकाने त्यांना बाहेर काढले, तेव्हा त्यांचे मृतदेह एकमेकांच्या मिठीत होते. ते कुटुंब दिल्लीहून भेटीसाठी आले होते. वडील प्रदीप मेस्सी आणि मुलगी सिया कसाबसा जीव वाचवून बाहेर पडले.
सुरक्षेची सर्व व्यवस्था होती
क्रूझ पायलट महेश म्हणाला, सुरक्षेची सर्व व्यवस्था होती, पण अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे क्रूझ नियंत्रणाबाहेर गेली. कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही. महेशला 10 वर्षांचा अनुभव आहे.
एका कुटुंबातील पंधरा सदस्य जहाजावर
खमारिया येथील आयुध कारखान्याच्या ए3 विभागात कर्मचारी असलेले कामराज आर्य आपल्या कुटुंबातील 15 सदस्यांसह क्रूझवर गेले होते. कामराजचे आई-वडीलही त्यांच्यासोबत होते, पण ते किनाऱ्यावर बसले होते. क्रूझवर कामराजसोबत त्यांची पत्नी, मेहुणी आणि मुले होती. कामराज मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांच्या एका मुलाची सुटका करण्यात आली. मात्र, कामराज, त्यांची पत्नी आणि दुसरा मुलगा अद्याप बेपत्ता आहे.
ही क्रूझ 20 वर्षे जुनी
पर्यटन विभागाचे अधिकारी योगेंद्र रिछारिया म्हणाले, बरगी धरणावर सध्या एक क्रूझ कार्यरत आहे. ती 2006 मध्ये बांधण्यात आली होती. तिची क्षमता 60 प्रवाशांची आहे. दुसरी एक क्रूझ शिप बंद पडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
