नवी दिल्ली : दिल्लीच्या नरेला परिसरात एका 87 वर्षाच्या वृद्धानं आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार डिसेंबरला रोहिणी परिसरातील खाद्य भांडारासमोर खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीला आरोपीनं खाऊचं आमिष दाखवून खाद्य भांडारात नेलं. पण या खाद्य भांडाराला कोणत्याही प्रकारचं छत नव्हतं. जेव्हा आरोपी चिमुकलीवर अत्याचार करत होता त्यावेळी एका महिलेनं आपल्या घरातून हा सर्व प्रकार पाहिला.
हा सर्व प्रकार पाहताच महिलेनं थेट आराडओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे अनेकजण तिथं धावून आले. पण त्यावेळी आरोपी तिथून तात्काळ निसटला. यानंतर पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीलाही तात्काळ अटक करण्यात आली आहे.