Kishtwar Accident : जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) किश्तवाडमध्ये (Kishtwar) आज (24 मे) एक भीषण अपघात (Accident) झाला. इथे धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटलं. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ घडली. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारं क्रूझर वाहन पलटी झालं. हा अपघात सकाळी 8.35 च्या सुमारास झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. तर तीन जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे बचावकार्य सुरु आहे.






अपघात झालेला परिसर दुर्गम


दुर्घटनेला दुजोरा देताना किश्तवाड जिल्हा एसएसपी खलील पोसवाल यांनी सांगितलं की, अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे डझनभर लोक जखमी झाले आहेत. अपघात झाला तो परिसर अतिशय दुर्गम आणि जिल्हा मुख्यालयापासून दूर आहे. मदत कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्व मजूर स्थानिक असण्याची शक्यता आहे.


जखमींना आवश्यक ती मदत पुरवली जातेय : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह 


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्वीट करुन या घटनेची माहिती दिली आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "डंगदुरु प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत किश्तवाडचे डीसी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. अपघातातील सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात किश्तवाड किंवा जीएमसी, डोडा इथे गरजेनुसार हलवण्यात येत आहे. जखमींना शक्य ती सर्व मदत केली जाईल.