डेहराडून/नैनीताल : उत्तराखंडच्या विविध भागांमध्ये, विशेषत: कुमाऊं भागात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंड सरकारने ही माहिती दिली आहे. पावसामुळे अनेक घरे कोसळली असून अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे नैनीतालकडे जाणारे तीन रस्ते बंद झाल्याने लोकप्रिय पर्यटनस्थळाचा राज्याच्या उर्वरित भागांपासून संपर्क तुटला आहे.


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये पत्रकारांना सांगितले की ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. धामी यांनी आश्वासन दिले की राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराची तीन हेलिकॉप्टर लवकरच येतील. यापैकी दोन हेलिकॉप्टर नैनितालला पाठवण्यात येतील जिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली असून लोकं ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. बचाव कार्यात मदत करण्यासाठी गढवाल प्रदेशात एक हेलिकॉप्टर पाठवले जाईल.


मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धनसिंह रावत आणि राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अशोक कुमार यांच्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रभावित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आणि सांगितले की त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. चारधाम यात्रेकरूंना आवाहन केले की ते जिथे आहात तिथेच राहा आणि हवामान सुधारण्यापूर्वी प्रवास सुरू करू नका. त्यांनी चामोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चारधाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिलेत.


पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे : धामी
धामी म्हणाले की, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. संततधार पावसाचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि सर्वोतरी मदतीचे आश्वासन दिले. नैनीतालमध्ये, मॉल रोड आणि नैनी तलावाच्या काठावर असलेल्या नैना देवी मंदिरात पूर आला आहे, तर भूस्खलनामुळे वसतिगृहाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. नैनीतालमधून मिळालेल्या अहवालानुसार, जिल्हा प्रशासन शहरात अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. शहरात आणि बाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इशारा देण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले असून प्रवाशांना पाऊस थांबेपर्यंत थांबण्यास सांगितले जात आहे.


सुमारे 100 लोक लेमन ट्री रिसॉर्टमध्ये अडकले
भूस्खलनामुळे शहराबाहेरचा रस्ता बंद झाला आहे. रामनगर-रानीखेत रस्त्यावरील लेमन ट्री रिसॉर्टमध्ये सुमारे 100 लोक अडकले असून कोसी नदीचे पाणी रिसॉर्टमध्ये घुसले आहे. नैनीताल जिल्ह्यात वीज, दूरसंचार आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील प्रचंड विस्कळीत झाली आहे. एसईओसीने सांगितले की, नैनीतालमध्ये 90 मिमी, हल्दवानी 128 मिमी, कोशाकुतोली 86.6 मिमी, अल्मोडा 216.6 मिमी, द्वारहाट 184 मिमी आणि जागेश्वर 176 मिमी पाऊस पडला.