नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून परतणार्या दिल्लीतील सर्व रहिवाशांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवणे अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) सांगितले की, कुंभमेळ्याहून परतणाऱ्या दिल्लीकरांना 14 दिवस घरी रहावे लागेल.
या आदेशात पुढे म्हटले आहे की 4 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत हरिद्वारच्या कुंभमेळ्यातून येणाऱ्या सर्व दिल्लीवासियांना दिल्ली सरकारच्या पोर्टलवर दिलेल्या लिंकवर तपशील अपलोड करावा लागणार आहे. यात नाव, दिल्लीचा पत्ता, संपर्क क्रमांक, आयडी पुरावा, आगमन व आगमनाची तारीख यांचा समावेश असेल. त्याचबरोबर 17 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यात जाणाऱ्या लोकांनाही ही माहिती द्यावी लागेल.
तपशील न दिल्यास संस्थात्मक क्वारंटाईन केलं जाणार
या आदेशात नमूद केले आहे की कुंभमेळ्यात गेल्यानंतर दिल्लीला परतणारी कोणतीही व्यक्ती जर तपशील सादर करत नसेल तर त्याला 14 दिवसांसाठी संस्थात्मक शासकीय क्वारंटाईन केले जाईल.
मध्य प्रदेशातही कुंभातून परत येणाऱ्यांसाठी क्वारंटाईन केलं जाणार
मध्य प्रदेश सरकारने शनिवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून परत येणाऱ्यांना अलग ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने सांगितले की कुंभमेळ्यातून येणाऱ्या सर्व लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या आगमनाची माहिती द्यावी लागेल.
गुजरातमध्ये मेळ्यातून येणार्या लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य
कुंभमेळ्यातून परत आलेल्यांसाठी गुजरात सरकारने आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून गुजरातला परतणार्या भाविकांना त्यांच्या गावात थेट प्रवेश दिला जाणार नाही. मेळ्यातून परत आलेल्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल.