रायपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचं 13 वर्षीय मुलाकडून अपहरण
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 11:55 AM (IST)
रायपूर : छत्तीसगढमधील रायपूरमध्ये अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायपूरमधील कबीरनगरमध्ये रविवारी दुपारी घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षीय मुलीचं अपहरण झालं. धक्कादायक म्हणजे अपहरण करणारा आरोपी अवघ्या 13 वर्षांचा आहे. या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 13 वर्षीय मुलगा आपल्या सायकलवर येऊन, मोठ्या चलाखीने चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवत सायकलवर बसवून पळवून नेताना सीसीटीव्हीत दिसतो आहे. चिमुकलीसोबत खेळणाऱ्या दुसऱ्या मुलीने घरात याबाबत तातडीने सांगितलं. मात्र, तोपर्यंत हा आरोपी तिथून पसार झालेला होता. अपहृत चिमुकली कबीरनगरमधील रहिवाशी राजकिशोर साहू यांची मुलगी आहे. संपूर्ण भागात चिमुकलीचा शोध घेण्यात आला. मात्र, ती कुठेच न सापडल्याने अखेर पोलीस तक्रार करण्यात आली. अपहरणाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.