मुंबई : नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेली 1000 रुपयांची नोट पुन्हा नव्यानं चलनात येणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र  आज केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी 1000 च्या नोटाबद्दल अद्याप कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं. आज शक्तिकांत दास यांनी ट्विट करत या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे.  तसंच पाचशे आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या नोटांच्या छपाईवर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


https://twitter.com/DasShaktikanta/status/834265950476181508

8 नोव्हेंबरनंतर रिझर्व बँकेनं पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. तसंच पाचशे आणि दोन हजारच्या नव्या नोटा चलनात आणल्या.चलनातून बाद झालेल्या पाचशेच्या नव्या नोटा लगेच चलनात आणण्यात आल्या. हजारच्या नव्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं सुरु केली आहे. या नोटा लवकरच चलनात येतील अशी चर्चाही सुरु होती.

पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीनंतर 15.44 लाख कोटींच्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने 20 फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये केल्यानंतर केवळ दोन दिवसांतच देशात पुन्हा चलनकल्लोळ जाणवण्यास सुरूवात झाली आहे.  त्यामुळे गरज असेल, तेवढेच पैसे काढा, असं आवाहनही केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केलं आहे.

सध्या देशातील अनेक भागातून एटीएममध्ये पैसे संपल्याची तक्रार येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लोकांनी त्यांना हवे तेवढचे पैसे काढावेत, गरजेपेक्षा जास्त पैसे काढल्याने इतरांना पैसे मिळत नसल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.