पाटणा : बागेतील आंबा तोडल्याच्या क्षुल्लक वादातून १० वर्षाच्या मुलाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बिहारच्या खगडिया जिल्ह्यात घडली. सत्यम कुमार असं मृत मुलाचं नाव आहे. बागेची सुरक्षा करणाऱ्या रामाशीष उर्फ रामा यादव याने सत्यमला गोळी मारली.


वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम मित्रांसोबत शेजारच्या गावात गेला होता. त्यावेळी एका बागेतून झाडाचा आंबा तोडण्यासाठी तो शेतात गेला होता. त्याने झाडावरील एक आंबा तोडला, त्यावेळी शेतात उपस्थित असलेल्या मालक रामाशीषने रागात सत्यमच्या डोक्यात गोली मारली. यामध्ये सत्यमचा जागीच मृत्यू झाला. रामाशीषने गोळी मारताच सत्यम सोबत असलेले त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. सत्यमच्या मित्रांनीच गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामाशीषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामाशीषला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी तो घरी नव्हता. आंबा तोडण्याच्या वादातून सत्यमची हत्या करण्यात आली की अजून काही कारण आहे याचा शोध पोलिस घेत आहे. याशिवाय बागेत कोणतीही बंदूक किंवा काडतुसं पोलिसांना मिळाली नाहीत.