मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India VS Pakistan) मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक (Murali Naik) हे शहीद (martyr) झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये पाकड्यांशी लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. ही बातमी गावी येताच कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला असून सऱ्यांनी एकच टाहो फोडलाय. दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये दिवसागणिक वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच भारतीय सैन्यांत देशसेवा बजावणाऱ्या शहीद मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. त्यावेळी या एकंदरीत युद्धजन्य परिस्थितीत जन्मदात्या आईच्या मानाची घालमेल होणं ही अगदी स्वाभाविक होतं. आईने मुरली नाईक याला थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, "देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन," असे म्हणून आईला आश्वास्त केलं.
नियतीने घात केला, व्हिडीओ कॉलवरील तो संवाद अखेरचा ठरला
मात्र नियतीने घात केला आणि हल्ल्याच्या काही तासांपूर्वीही आईला केलेलं तो व्हिडीओ कॉल आणि त्यावरील संवाद अखेरचा ठरला. यावर बोलतांना मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले की, माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, याचा अभिमान आहे.असे ते सांगतात. मात्र आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि मातृप्रेमापुढे देशभक्ती श्रेष्ठ ठरल्याचे ही यावेळी दिसून आलं.
एकनाथ शिंदे यांची अंत्यविधीला उपस्थिती
मुरली नाईक यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी कल्ली थंडा या गावी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुरली नाईक हे मुंबईचे राहणारे असून त्यांना पाकिस्तानी हल्ल्यात वीर मरण आले आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे या अंत्यविधीसाठी एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी वीरगती प्राप्त जवानाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते म्हणाले की, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन हिंदू मायभगिनींचे सौभाग्यलेणे हिरावून घेणाऱ्या कट्टरपंथी अतिरेक्यांच्या क्रौर्याचा बदला घेऊन मायभूमीच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुरली नाईक या जवानाला वीरगती प्राप्त झाली.
देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या मुरलीच्या कुटुंबाशी आमच्या पक्षाचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे आमच्या पक्षपरिवारातला हिरा हरपला आहे. हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मुरलीच्या आत्म्यास सद्गती मिळेलच. या कुटुंबाची भेट मी घेणार आहेच, पण त्यांचे सांत्वन करताना माझे शब्द जडावतील…असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा
