India Pakistan War: भारतीय नौदलाकडून समुद्रात 'शूट टू किल'ची ऑर्डर; मुंबईतील मच्छिमारांना महत्त्वाच्या सूचना
Indian Navy: भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला असताना मुंबईतील मच्छिमारांना भारतीय नौदलाकडून अतिशय महत्वपूर्ण सूचना देत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

India Pakistan War : पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर भारताने योग्य प्रत्युत्तर देत पाकड्यांचे मानसुभे हवेतच नेस्तनाबूत केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ जबर दणका देत पुन्हा डिवचू पाहणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या 15 शहरांवर केलेला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने यशस्वीरित्या परतवून लावलाय. दोन देशातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर (India Pakistan War situation) देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्याची राजधानी मुंबईतील मच्छिमारांना भारतीय नौदलाकडून (Indian Navy) अतिशय महत्वपूर्ण सूचना देत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय नौदलाकडून समुद्रात 'शूट टू किल'ची ऑर्डर
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नौदल ठिकाणं आणि संवेदनशील ठिकाणी मच्छिमरांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या देखील सूचना देण्यात आल्या आहे. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 मे) उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावली आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षेचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असून काही महत्वाचे निर्णय होण्याची ही शक्यता आहे.
तुर्कीचे कार्गो विमान कराचीत, ड्रोन पुरवल्याची शक्यता
जगभरातील अनेक देशांनी एकीकडे भारताला पाठिंबा दर्शवला असताना तुर्की पाकिस्तानच्या मदतीला आल्याचे बोलले जात आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले असून या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन मदत पाठवल्याचा दावा केला जात असला तरी भारत विरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.


















