Independence Day 2025 : देशाची राजधानी दिल्लीत येत्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) अनुषंगाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने राजधानीत कडक सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून पाहारा देत आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीच लाल किल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली असून त्यात मोठी चूक झाल्याचे आढळून आले आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांचा विशेष सेल मॉक ड्रिल दरम्यान लाल किल्ल्याच्या आत डमी बॉम्ब (Dummy Bomb) घेऊन पोहोचलाय. परिणामी सुरक्षेतील त्रुटींमुळे ड्युटीवर तैनात असलेल्या सात पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
सुरक्षेतील त्रुटी, पोलीस डमी बॉम्ब घेऊन लाल किल्ल्यावर पोहोचले
पुढे आलेल्या माहितीनुसार, डीसीपी राजा बांठिया यांनी सुरक्षा सुधारण्याचे आदेश दिले होते. अशातच 15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती. या काळात पोलीस डमी बॉम्ब घेऊन लाल किल्ल्यावर पोहोचले. पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामुळे लाल किल्ला दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे सुरक्षेतील त्रुटी ही गंभीर बाब आहे. परिणामी सुरक्षेतील त्रुटींमुळे ड्युटीवर तैनात असलेल्या सात पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सध्या निलंबित पोलिसांविरुद्धही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लाल किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न, बांगलादेशी नागरिक पकडले गेले
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवारी (4 ऑगस्ट) पाच बांगलादेशी नागरिक लाल किल्ल्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले आहे. आता 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी आकाशातही वाढवला कडक बंदोबस्त
सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी 16 ऑगस्टपर्यंत राजधानीत पॅराग्लायडर, हँग-ग्लायडर आणि हॉट एअर बलून सारख्या उप-पारंपारिक हवाई प्लॅटफॉर्मच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमापूर्वी, दिल्ली पोलिसांनी याबाबत एक आदेश देखील जारी केला आहे. आदेशात असे म्हटले आहे की पॅरा-मोटर्स, हँग-ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट विमाने, रिमोट-कंट्रोल्ड विमाने 16 ऑगस्टपर्यंत बंदी राहतील. आदेशात सुरक्षेची कारणे नमूद करण्यात आली आहेत.
हेही वाचा>>>