Ulhasnagar News : "मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!", अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ (RPF) जवानाने वापरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शाब्दिक वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी (Marathi)अधिकाऱ्यानेही तुम्ही हिंदीत बोला असे सांगितले आहे. किंबहुना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे. 


एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना, आणि राज्यातील फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने शासकीय कार्यालयात आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असताना आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून मात्र या शासन निर्णयाला चक्क केराची टोपली  दाखवल्याचे बोललं जात आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले असता, एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून 'मराठीत बोला' असं सचिन कदम यांनी म्हटलं असता, मला मराठी येत नाही, असं त्याने म्हटलं. त्यावर याबाबत मी डीआरएमकडे तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी म्हणताच 'जा माझी तक्रार करा, अशी भाषा या आरपीएफ जवानाने वापरली. तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही 'त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला', असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असं मनसेच्या सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं. 


परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्या


त्यावर 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?' असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या