Hingoli Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही भागात पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या पावसामुळं वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला पूर आला आहे. पावसाचे पाणी नदीचे पात्र सोडून वाहत असल्यानं जवळपासच्या शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.


पावसामुळं वातावरणात गारवा 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार सुरु असलेल्या या पावसामुळं बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वातावरणात सुद्धा कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. सध्या सुरु असलेल्या या पावसामुळं पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे अनेक नदी नाले ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला सुद्धा या पावसामुळं पूर आला आहे. पावसाचे पाणी नदीचे पात्र सोडून वाहत असल्यानं जवळपासच्या शेतीचं नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या भागामध्ये सोयाबीन, कापूस, हळद आणि ऊस या पिकांची लागवड केली जाते. प्राथमिक माहितीनुसार या नदीच्या शेजारील असलेल्या शेतामध्ये नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.


लोहगाव शिवारात शेती पिकांचं नुकसान 


हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव शिवारात असलेल्या ओढ्याचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतातील सोयाबीन, हळद, कापूस यासह अन्य पिकांचं या पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अगोदरच दुबार पेरणीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यासमोर आता नवसंकट उभं राहिलं आहे. लोहगाव येथील शेतकरी तुराब खान पठाण यांची 5 एकर शेती या ओढ्या लगत आहे. ओढ्याचे पाणी शेतकरी पठाण यांच्या शेतामधून वाहू लागले. यामुळे शेतात पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस आणि हळद या पिकांचं पूर्णपणे नुकसान झाला आहे. सर्व पिके नष्ट झाली आहेत. अगोदरच पाऊस न झाल्यामुळं शेतकरी तुराब खान पठाण यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली होती. परंतु पेरणी केल्यानंतर सुद्धा आता ओढ्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे नुकसान झालं आहे. 


राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस


राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.