Hingoli Earthquake News : हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाची नोंद भूमापक केंद्रामध्ये झाली आहे 3.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप असून या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हाणच्या शिवारात 5 किलोमीटर भूगर्गात खोल आहे.
भूकंपामुळे कोणतेही नुकसान न झाल्याची माहिती समोर
दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान न झाल्याची माहिती समोर आली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.
नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के
नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार धक्के बसले, तर पालघर जिल्ह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Nashik Earthquake: नाशिकच्या सुरगाण्यात एकापाठोपाठ 4 हादरे
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव (Borgaon) आणि आसपासच्या परिसरात आज सकाळी 9.55 वाजल्यापासून भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 नोंदवली गेली आहे. एकापाठोपाठ एक अशा चार वेळा जमिनीला हादरे बसल्यामुळे बोरगाव परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक घराबाहेर पडले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कुठलेही नुकसान झालेले नाही. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अजिबात न न घाबरता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Palghar Earthquake: पालघरच्या कासा धुंदलवाडीत 3.1 तीव्रतेचा धक्का
दुसरीकडे, पालघर मध्ये आज सकाळी दहा वाजून 57 मिनिटांच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा जाणवला असून या हादऱ्याची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी कासा या परिसरात हा भूकंपाचा हादरा जाणवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यात 2018 पासून भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच असून आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक कमी जास्त तीव्रतेचे भूकंपाचे हादरे या परिसरात बसले आहेत. सतत सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा ग्रामीण भागातील घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं समोर आला आहे.