हिंगोली : नीट पेपरफुटीसंदर्भात राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन संपल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) गावखेड्यातील शाळांचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील शाळेत जाऊन पाहणी केली. आता, वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही देशभर दौरा करणार आहोत. काही दिवसापूर्वी 'स्कूल ठीक करो' हे कॅम्पेनिंग देशभर राबवले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार या कॅम्पेनची सुरुवात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिजीत दिपके यांचे मूळ गाव असलेल्या हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या संतुक पिंपरी या गावातून करण्यात आली.
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याकडून आज हिंगोलीमध्ये स्कूल ठीक करो अभियानाची सुरुवात त्यांच्या मुळगाव असलेल्या संतुक पिंपरी या ठिकाणावरून करण्यात आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त गावामध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यासाठी शाळेमध्ये दाखल झाले. जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीत जाताना, शाळेतील खिडक्या फुटक्या असल्याचा पाहायला मिळालं. त्यामध्ये, नवल म्हणजे फुटलेली खिडकी झाकून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले बॅनर त्या खिडकीला लावण्यात आलं होतं. त्यानंतर, दिपके यांनी शाळेतल्या शौचालयाची पाहणी केली असता शौचालयाची दूरावस्था सुद्धा लपून राहिली नाही. शौचालयामध्ये अत्यंत दुर्गंधी पाहायला मिळाली. तसेच, शौचालयामध्ये आणि मुतारीमध्ये अत्यंत दुर्गंधी पसरल्याचं दिसून आलं. ही पाहणी झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी शाळेतील विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.
शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं. या सर्व समस्या अभिजीत दिपके यांनी लिहून घेतल्या, तसेच हे कॅम्पेनिंग करत असताना शाळेला भेट दिल्यानंतर कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत किंवा नाहीत या संदर्भामध्ये सीजेपीच्या वतीने एक फॉर्म तयार करण्यात आला होता, तो फॉर्म सुद्धा दिपके यांनी भरला आहे. याप्रकारे सर्व फॉर्म भरून सर्व डाटा संकलित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोषण आहाराची नोंद एक, आहार दुसराच
शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व्यवस्थित मिळतो का, याची सुद्धा विचारणा अभिजीत दिपके यांच्याकडून करण्यात आली असून शाळेच्या पोषण आहाराचे रजिस्टर अभिजीत दिपके यांनी तपासलं. रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा मेन्यू आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार, यामध्ये तफावत असल्याचं विद्यार्थ्यांसोबत केलेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या लक्षात आलं. शाळांची दुरावस्था आणि निर्माण झालेल्या अडचणी या संदर्भात दिपके यांनी संतुक पिंपरी गावचे सरपंच यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. तसेच, पुढील काही दिवसात सर्व अडीअडचणी सोडवू असं आश्वासन सरपंचांच्यावतीने देण्यात आलं. दरम्यान, अभिजीत दिपके लिंबाळा गावाच्या परिसरात असलेल्या अपंग निवासी विद्यालयामध्ये गेले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी अडीअडचणी ऐकून घेतल्या.
हेही वाचा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
