वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे शेतमजुरांनी शेताकडे पाठ फिरवली होती. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून अजब फंडा अवलंबला आहे.

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बाईकवर वापरलं जाणारं हेल्मेट कीटकनाशक फवारणीवेळी वापरलं आहे. जेणेकरुन विषबाधा रोखता येईल.

वृषाल पाटील, प्रयोगशील शेतकरी

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, यामुळे शेतीत काम करण्यास मजूर मिळणंही मुश्किल झालं होतं. मात्र सेलू तालुक्यातील या शेतकऱ्याच्या हेल्मेट प्रयोगामुळे शेतमजूरही मिळू लागले आहेत. वृषाल पाटील असे या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे.

वृषाल पाटील हा युवा शेतकरी शेतीत नेहमीच नव-नवीन प्रयोग करत असतो. असाच प्रयोग या गाडीचा हेल्मेटच्या मदतीने केला आहे. फवारणी करताना उडणाऱ्या तुषारांमुळे अनेक शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर काहींना डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. हेल्मेटच्या सहाय्याने फवारणी केल्यास या सर्व गोष्टींपासून आपला बचाव होतो, असे वृषाल पाटील यांचे म्हणणे आहे.

हेल्मेट प्रयोगाचा फायदा आता मजुरांना होत असल्याने त्यांनीही पुन्हा शेतीची वाट धरली आहे. थोडा त्रास होत आहे, पण 300 रुपये मजुरी मिळत असताना विषबाधा झाल्यावर होणारा 500 ते 700 रुपयांच्या आर्थिक फटक्यापासून रक्षण होतंय. शिवाय आरोग्याला होणारी हानीही थांबली आहे.



भीतीच्या वातावरण निर्माण झाल्याने अनेक मजुरांना घरात बसण्याची वेळ आली होती. पण आता हा प्रयोग फायद्याचा ठरत असल्याने इतर शेतकऱ्यांकडे मजूर आता हेल्मेटची मागणी करत आहेत.

फवारणीचा त्रास झाल्यास त्याचा थेट परिणाम नाक, डोळे आणि तोंडाला होता. आणि हेल्मेटमुळे याच अवयवांचं रक्षण करणं सहज सोपं होतं.

आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून बियांना आणि औषधी विक्रेत्यांनी खरेदीवर इतर वस्तू देण्यापेक्षा फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून एक किट स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय बमनोटेंनी दिली.