Maharashtra Weather Update: नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पावसाची (Heavy Rain in Nagpur) सततधार पाहायला मिळत आहे. अशातच काल (मंगळवार) सकाळी 8:30 ते रात्री 11:30 वाजता दरम्यान नागपुरात 77.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर काल (8 जुलै) मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला असून रात्री दीड वाजल्यापासून आतापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरात होत आहे. त्यामुळे नागपूरातील अनेक रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूरच्या रामनगर परिसरात हिल रोड ते पांढराबोडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. त्यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागपूरकरांना आज अनेक त्रासांना सामोरे जावं लागू शकते. हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटरला सुट्टी जाहीर केली आहे.
अनेकांच्या घरात शिरले पाणी
दरम्यान, नागपूरच्या मानकापूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी जवळच्या भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास जवळून वाहणाऱ्या नाल्याचा पाणी वस्तीत शिरलंय आणि लोकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी जमा झालं आहे. त्यामुळे लोकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.
विमानतळ परिसरात 2 फुटापर्यंत पाणी
दुसरीकडे नागपूरच्या विमानतळ परिसरातील डॉ.हेडगेवार चौकात 2 फुटापर्यंत पाणी साचलेय. त्यामुळे विमानतळाच्या आता व बाहेर जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसत आहे. नागपूर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मनीषनगर, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट अंडरपास पाण्याखाली गेले आहे. कॉटन मार्केट अंडरपासपासमध्ये परिवहन विभागाची एक बस व एक मालवाहू वाहन अडकले आहे. पोलीस प्रशासन व नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत सुरक्षा कठडे न लावल्याने आम्ही वाहन अंडरपासमध्ये अडकल्याचे चालकांनी सांगितले.
नाल्याचा पाणी लोकांच्या घरात शिरलं, घरगुती साहित्याचा मोठं नुकसान
नागपूरच्या सदिच्छा कॉलोनी जवळून वाहणाऱ्या नाल्याचा पाणी कॉलोनीतील अनेक घरांमध्ये शिरल्यामुळे रहिवाशांचे नुकसान झाले आहे. कोटुलवार कुटुंबीयांच्या घरी तळमजल्यावर गुडघाभर पाणी शिरल्यामुळे फ्रिजसह घरगुती साहित्याचा आणि साठवलेल्या धान्याचे मोठे नुकसान झाला आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास जेव्हा कुटुंबियांना जाग आली, तेव्हा घरात एक फुटापर्यंत पाणी शिरला होतं. त्यानंतर घरगुती साहित्य वाचवण्याची धडपड सर्व कुटुंबीयांनी केली आणि सर्व साहित्य उंचावर ठेवले. मात्र तरी ही अनेक वस्तू वाचवता आल्या नाही.
इतर महत्वाच्या बातम्या