Gondia News : ई-रिक्षा चार्जिंगला लावत असताना विद्युत करंट (Electric Shock) लागून पिता-पुत्रांच्या मृत्यू झाल्याची घटना गोंदिया (Gondia Accident News) जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे घडली. नरेश बरियेकर (वय 55 वर्ष) आणि दुर्गेश नरेश बरियेकर (वय 22 वर्ष) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. संत रविदास वॉर्डातील नरेश बरियेकर हे त्यांची ई-रिक्षा चार्जिंगला लावत असताना अचानक टिनाच्या शेडला विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने शेडमधून विद्युत प्रवाह शटरमध्ये आला. यावेळी नरेश बरियेकर यांनी शटरला स्पर्श करताच त्यांना विजेचा शॉक बसला. यावेळी त्यांचा मुलगा दुर्गेश याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही विजेचा शॉक लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. सध्या तिरोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र पिता-पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून बरियेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
केटीएस रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागली आग; रुग्णांची उडाली तारांबळ
गोंदियाच्या केटीएस जिल्हा रुग्णालयाच्या विद्युत कक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने काही वेळापर्यंत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. सुदैवानी या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शॉर्टसर्किटमध्ये विद्युत कक्षाला लागलेल्या आगीमुळे केटीएस रुग्णालयाच्या ओपीडी परिसरात सर्वत्र धूर पसरलेला होता. यामुळे काही वेळापर्यंत रुग्णालयाच कामकाज बंद करण्यात आल होतं. वेळीच अग्निशमन दल आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर नाक्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्याजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमध्ये ड्रायव्हर स्वयंपाक करत असताना गॅस पाईप लिक झाल्याने ही आग लागल्याची माहिती पुढे आली आहे. यात ट्रक जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. तर या आगीमुळे चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निश्मन वाहनाला पाचारण करून ट्रकला लागलेली आग विझविण्यात आली. या घटनेमुळे काही वेळ सीमा तपासणी नाका परिसरात तारांबळ उडाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या