Vasai News : ना पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, ना लाइफगार्डची नियुक्ती; वसईतील राजोडी समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनावेळी सुरक्षेचा बोजवारा
Ganesh Visarjan 2025: वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर दिड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसई : वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर दिड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किनाऱ्यावर ना पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, ना लाइफगार्डची नियुक्ती, त्यामुळे अंधारात नागरिकांना विसर्जन करताना जीवघेणा धोका पत्करावा लागत आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक राजोडी समुद्र किनाऱ्यावर बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी हजेरी लावत असतात. मात्र, किनाऱ्यावर वीजपुरवठा अथवा लाईटची सोय नसल्याने पूर्ण अंधार पसरतो. यामुळे लाटांचा अंदाज न आल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक वाढते. नागरिकांना चाचपडतच पाण्यात उतरावे लागत असल्याचे दृश्य दिसून आले.
ना पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, ना लाइफगार्डची नियुक्ती
विसर्जनावेळी सर्वाधिक गरज असते ती प्रशिक्षित बचाव कर्मचाऱ्यांची. मात्र राजोडी किनाऱ्यावर लाइफगार्डच हजर नव्हते. नागरिकांनीच एकमेकांना आधार देत विसर्जन केले. “जर कोणाचा अपघात झाला तर मदतीसाठी कोणीच नाही” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय. परिणामी, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. सध्या राजोडी किनाऱ्यावर परिस्थिती अशी आहे की, लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांसाठी विसर्जन करणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. प्रशासनाने तात्काळ प्रकाशयोजना व लाइफगार्डची व्यवस्था केली नाही, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर!
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी भक्तांना कोंडीत अडकून बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र, यंदा अशी अडचण येऊ नये यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी एक अनोखा डिजिटल उपक्रम राबवला आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील 10 प्रभाग कार्यालयांच्या हद्दीतील विसर्जन स्थळांची माहिती गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणेश भक्तांना आपल्या सोयीनुसार जवळचे नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळ निवडता येणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या विसर्जन स्थळी गर्दी असल्यास गुगल मॅपद्वारे दुसरे पर्यायी स्थळही निवडता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन विसर्जन सोयीस्कर व सुरळीत होणार आहे. भक्तांना फक्त एका क्लिकवर आपल्या गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर होणार आहे.
अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान युवक पाण्यात बुडाला
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
हेही वाचा
























