Gadchiroli: “थोडा वेळ थांबा, इथेच प्रसूती होईल,” असं सांगून डॉक्टर आणि परिचारिकेने रुग्णवाहिका परत पाठवली. मात्र 12 तासांनंतरही गर्भवती महिलेची प्रसूती झाली नाही. अखेर कुटुंबियांनी रुग्णालयात महिलेला हलवले. मात्र, डॉक्टर अन् परिचारिकेच्या एका निष्काळजी निर्णयामुळे 31 वर्षांची गर्भवती महिला मनिषा शत्रुघ्न धुर्वे हिचा मृत्यू झाला. गडचिरोलीत देसाईगंज तालुक्यातील विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आदिवासी गर्भवती महिलेने डॉक्टर आणि परिचारेकेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे जीव गमावल्याची घटना घडली. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गणेश मुंडले आणि कंत्राटी परिचारिका उषा उके यांना कायमचे काढून टाकले आहे.
नक्की घडले काय?
विसोरा येथील मनिषा धुर्वे हिची पहिलीच प्रसूती होती. त्यासाठी तिला 13एप्रिलला गावातीलच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर बराच वेळ होऊनही मनिषाची प्रसूती झाली नाही. त्यामुळे मनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावून तिला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विसोरा येथील उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी 'आणखी थोडा वेळ थांबा, मनिषाची प्रसूती येथेच होईल', असे तिच्या कुटुंबीयांना सांगून रुग्णवाहिका परत पाठवली. परंतु तब्बल 12 तास उलटूनही मनिषा प्रसूत झाली नाही. शेवटी तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनीही प्रसूती होईल, असे सांगितले. परंतु प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांना 14 एप्रिलच्या संध्याकाळी तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला. त्यानंतर आज देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आज देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु असताना गावकऱ्यांनी आंदोलन करीत दोषी डॉक्टर आणि परिचारिकांना निलंबित करेपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला. प्रशासनाने जिल्हा माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करत अखेर डॉ. मुंडले आणि परिचारिका उके यांची सेवा कायमस्वरूपी समाप्त केली आहे.
हेही वाचा: