गडचिरोली : जिल्ह्यात चर्चेत असलेल्या धान घोटाळ्याप्रकरणी देऊळगाव (Gadchiroli) खरेदी केंद्राच्या 5 संचालकांना कुरखेडा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. धान घोटाळा प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह 17 जणांवर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला होता. त्यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून आता आणखी पाच जणांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या 7 झाली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी उप प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेच व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह 10 आरोपी अद्यापही फरार आहेत.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गाजलेल्या 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षात तब्बल 10 हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती. त्याप्रकरणी, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (5), 318 (4), 3 (5) अन्वये गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना आधीच अटक करण्यात आली. काल आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक व देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम हे अद्याप फरार आहेत. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतही धान घोटाळा
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव आणि केंद्रप्रमुखास धान घोटाळा प्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. किशोर पदा असे संस्था सचिवाचे, तर सुरेश पुंगाटी असे केंद्रप्रमुखाचे नाव आहे. संस्था अध्यक्ष सुधाकर पुंगाठी हे फरार आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम 2022-23 मध्ये खरेदी केलेल्या धान्यात 1.37 कोटी रुपये किमतीचे 13 हजार धानपोती कमी आढळली होती. या गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या या तिघांसह मदतनीस प्रवीण दुर्गे, अहेरी येथील प्रभारी विपणन अधिकारी सोनाली पेंदाम या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर संस्थाप्रमुख आणि सचिवाला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा
फिरोज सय्यद निघाले पठाणकोटला; रेल्वे स्टेशनवर गाव जमलं 3 भूमिपुत्रांना 'बॉर्डर'वर सोडवायला
