Gadchiroli News :गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यूझाला असून तिघेजण जखमी आहेत. अखिल बिश्वास असे मृतकाचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही झाडाखाली आश्रयाला गेले असताना वीज कोसळली
मासेमारी करताना अचानक पाऊस सुरु झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही झाडाखाली आश्रयाला गेले होते. तेव्हा अचानक वीज कोसळली. यात चौघेजण जखमी झाले आहेत. अखिल बिश्वास यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. तर उर्वरित तिघांवर रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
मुंबईसह राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस, साकीनाका खैरनी रोड इथं मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
राज्यभरात पावसाने हाहाकार घातला असून मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळ काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अस्लम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे. साधारण 45 वर्षांचा व्यक्ती सकाळी 11 च्या सुमारास मॅनहोलमध्ये पडली होती. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेली होती. यावेळी महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मॅनहोलमधून व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: