Gadchiroli News गडचिरोली: जिल्ह्यातील अहेरी शहरालगत असलेल्या नागेपल्ली येथे गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत वस्तीगृहावर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने कारवाई करत तब्बल 91 विद्यार्थ्यांची सुटका केली. या कारवाईनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निवासी वस्तीगृहात असलेले अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गाचे विद्यार्थी आपला धर्म ख्रिश्चन असून आम्ही, आमचे आई-वडिल ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे उघडपणे सांगत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकारामुळे निवासी वस्तीगृहाच्या नावावर एक प्रकारे धर्मांतरणाचे धडे दिले जात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे बुधवारी महिला व बालकल्याण विभागाने अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत अनधिकृतपणे गेल्या 11 वर्ष पासून सुरू असलेल्या फ्रेंड मिशनरी प्रेयर बँड चेन्नई या संस्थेमार्फत संचालित आशीर्वाद मुला मुलींच्या वस्तीगृहातून तब्बल 49 मुली आणि 42 मुले अशा 91 विद्यार्थ्यांची सुटका केली. या तपासणीमध्ये वस्तीगृहाला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागाची मान्यता नसल्याने ही कारवाई केली.
प्रशासन ॲक्शन मोडवर-
अनाधिकृत असल्याच्या कारणावरून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची सुटका करत शासनमान्य वस्तीगृहात विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय करण्यात आली असली तरी या प्रकारानंतर जिल्हा प्रशासन चांगलाच ॲक्शन मोडवर आहे. संबंधित संस्थेला गेल्या 11 वर्षापासून कुठलीही मान्यता नसताना बिंदिकतपणे वस्तीगृह सुरू होते. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहाशे रुपये, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बाराशे रुपये दरमहा आकारले जात होते. अशाही परिस्थितीत गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 91 विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेत होते.
अधिकारी काय म्हणाले?
तपासणी पथकाच्या चौकशीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वस्तीगृहात सकाळी आणि सायंकाळी ख्रिश्चन धर्माची प्रेयर होते. तर तपासणी दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याकडे बायबल हे ख्रिश्चन धर्मग्रंथ आढळून आले तर वस्तीगृहातील भिंतींवरही केवळ ख्रिश्चन धर्माचर प्रसिद्धी पत्रक होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या संस्थेचे राज्यात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे वस्तीगृह शाळा सुरू असून 2015 मध्ये नाशिक जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आल्याने नोटीस बजावण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच ही संस्था विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच धर्म परिवर्तनाचेही धडे देत होती. मग हा प्रकार गेली अकरा वर्ष प्रशासनाच्या निदर्शनास का आला नाही? जिल्ह्यात असे आणखी काही वस्तीगृह आहेत काय? मग प्रशासन यावर वेळीच ॲक्शन का घेत नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे.