Gadchiroli News : महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद संपुष्टात आणण्यासाठी, माओवादावर निर्णायक प्रहार करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर छत्तीसगड सीमेवरून अवघ्या 200 मीटर अंतरावर उभारलेले कवंडे पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी भेट देऊन पोलीस आणि स्थानिक जनतेशी संवाद साधला. 

या ठिकाणी सध्या टेन्ट आणि लोखंडी कंटेनर्समध्ये राहून गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान परिसराला सुरक्षा प्रदान करत आहे. मात्र, लवकरच या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त पोलीस स्टेशन उभारले जाईल, अशी ग्वाही गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे. 

गेल्या दोन वर्षात गडचिरोलीतील तब्बल दीड हजार वर्ग किलोमीटरचा भाग जिथे पोलीस पोहोचले नव्हते, तो अत्यंत दुर्गम आणि कठीण भूभाग ही पोलिसांनी आपल्या नियंत्रणाखाली आणलं आहे. कवंडे पोलीस स्टेशनची स्थापना त्याच रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे निलोत्पल म्हणाले. अजूनही काही भाग असे आहेत जिथे पोलिसांची उपस्थिती नाही किंवा ते पोलिसांच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. मात्र, येणाऱ्या काही महिन्यात त्या ठिकाणी पोलिसांचे वर्चस्व निर्माण करू आणि कवंडे त्याच रणनीतीचा एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर कवंडेसारख्या अत्यंत दुर्गम, कठीण भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागात, कोणतीही सुविधा नसताना, टेन्ट आणि कंटेनरमध्ये पोलीस का राहत आहे? या जागेचा माओवादाविरोधातल्या निर्णायक लढ्यात रणनीतीक काय महत्त्व आहे? याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिलीये.  

माओवाद विरोधी लढ्यात कवंडेचे महत्त्व काय?

- कवंडे हा महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर इंद्रावती नदीच्या काठावरील भाग. 

- इंद्रावती नदी उन्हाळ्यातही भरभरून वाहते. परिणामी या भागात वर्षभर नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक बेट तयार होतात. 

- या बेटांवर किंवा नदीच्या अवतीभवतीच्या चिखलयुक्त भागात माओवादी सुरक्षित आश्रय घ्यायचे.

- कवंडे छत्तीसगड सीमेपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर महाराष्ट्रात असल्याने छत्तीसगडमध्ये मोठी घटना घडवून माओवादी नेहमीच कवंडेच्या अवतीभोवतीच्या आश्रयस्थानी लपून राहायचे. 

- आता या भागात पोलिसांच्या उपस्थितीमुळे माओवाद्यांच्या हालचालींवर वचक बसणार. - पावसाळ्यात इंद्रावती नदीमुळे कवंडे आणि अवतीभवतीचे अनेक गावे तीन ते चार महिने पूर्ण जगाशी संपर्कविहीन राहायचे. 

- या स्थितीचा फायदा घेत माओवादी याच भागात सुरक्षित बसून राहायचे. 

- कवंडेमध्ये तात्पुरते पोलीस स्टेशन उभारून पोलीस कायमस्वरूपी बसून राहिल्यामुळे आता या भागात रस्ते आणि पुलांचे काम तीव्रतेने सुरू करता येणार. 

- पोलीस या ठिकाणी पोहोचल्यामुळे पहिल्यांदाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कवंडे आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांना देणे शक्य होणार. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis: कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत रस्ता खोदून टाकला; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी झापले