Gadchiroli Accident News: गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे (Geetatai Hinge) यांचे पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Gadchiroli Accident News: नागपूरहून परत जाताना भीषण अपघात
गीताताई हिंगे या रविवारी खाजगी कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री गडचिरोलीकडे परत येत असताना पाचगाव परिसरात त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
Gadchiroli Accident News: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
गीताताई हिंगे या मूळच्या भाजपच्या सक्रिय पदाधिकारी होत्या. त्यांनी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्ष व जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. नगरपरिषद निवडणुकीआधी भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आणि पक्षात दाखल होताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्यात नवी ऊर्जा येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
Gadchiroli Accident News: सामाजिक कार्यातही पुढाकार
गीताताई हिंगे यांनी राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. त्या आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या आणि संस्थेमार्फत अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात त्यांनी पुढे केला होता. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन गरजूंना अन्न, औषधे व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कामाची जिल्ह्याभरात प्रशंसा झाली होती.
Gadchiroli Accident News: गडचिरोलीवर शोककळा
गीताताई हिंगे यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्याने एक जिद्दी, सक्रिय आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. राजकीय कामात तत्परता, जनसंपर्कात सहजता आणि सामाजिक उपक्रमांतील बांधिलकी यामुळे त्या जिल्ह्यात लोकप्रिय होत्या. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आणखी वाचा