गडचिरोली : छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याला पुराचा मोठा वेढा पडला आहे. इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने भामरागडमधील पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या मुसळधार पुरामुळे भामरागड तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा उर्वरित भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून तब्बल 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Continues below advertisement

Bhamragad Flood Details : 300 घरे पाण्याखाली, आजची रात्र पुराच्या सावटाखाली

अमरावती आणि गडचिरोलीच्या या दुर्गम भागात अनंत चतुर्दशीच्या दिवशीच पुराचे पाणी गावात शिरण्यास सुरुवात झाली. सकाळी आल्लापल्ली-भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास भामरागड गावात पुराचे पाणी शिरले. सुमारे 300 घरे पाण्याखाली गेली असून मुख्य रस्ते जलमय झाले आहेत.

शनिवार दुपारनंतर पाण्याचा स्तर काहीसा ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी पाणी अत्यंत संथगतीने कमी होत आहे. त्यामुळे भामरागडकरांना रात्रही पुराच्या भीतीच्या सावटाखालीच काढावी लागणार आहे.

Continues below advertisement

Bhamragad Flood Rescue Operation : SDRF आणि C-60 जवानांचे शौर्य

या गंभीर पूरपरिस्थितीत प्रशासनासह एसडीआरएफ (SDRF) आणि पोलीस दलाच्या सी-60 (C-60) जवानांनी देवदूतासारखी कामगिरी बजावली आहे. बिनागुंडा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीला उपचाराची अत्यंत गरज होती. रस्ते आणि नाले पाण्याखाली गेलेले असताना एसडीआरएफ पथकाने गुंडेनूर नाला पुराच्या पाण्यातून पार करत मुलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप पोहोचवले.

बिनागुंडा येथील एका आजारी शिक्षिकेला लाहेरी आरोग्य केंद्रात नेण्यासाठी सी-60 जवानांनी पुराच्या पाण्यातून रेस्क्यू ऑपरेशन राबवले. याशिवाय इतर 3 गंभीर आजारी रुग्णांना देखील पुराच्या पाण्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Administration Warning : पाण्याचा प्रवाह तीव्र, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पुराचे पाणी ओसरत असले तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले आणि पुराच्या पाण्यात उतरण्याचा किंवा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करू नये, असे कडक आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात मदत पथके आणि वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

ही बातमी वाचा: