Gadchiroli News  गडचिरोली : महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या युवा अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू (Gadchiroli News) झाला आहे. शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात बुडून हा मृत्यू (Accident News) झाला. एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली हि घटना घडली आहे. दलसु कटिया नरोटे (37 वर्ष) असे अभियंत्याचे नाव असून जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनानिमित्त काही दिवसांच्या सुट्या घेऊन ते पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह आपल्या गावाकडे आले होते. दलसू हे नांदेड तालुक्यातील मुखेड येथे महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते.

दरम्यान, शुक्रवारी शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने ते शेतावर गेले. दरम्यान फिरत ते लगतच्या नाल्यावर गेले. पण तिथे फिट (मिर्गी) आल्याने ते पाण्यात पडले. बऱ्याच वेळपासून ते परत न आल्याने घरच्यांनी शेताकडील नाल्याकडे शोध घेतला. त्या ठिकाणी ते नाल्याच्या पाण्यात पडून असल्याचे आढळले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

आरमोरी इमारत दुर्घटना; शोरूम मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

गडचिरोली : आरमोरी येथील भगतसिंग चौकातीत दुचाकी शोरूमच्या इमारतीची जीर्ण झालेली मागील बाजुची भिंत शुक्रवारी संध्याकाळी कोसळली. त्याखाली दबून तीन युवकांना हकनाक जीव गेला. याशिवाय तिघे जण जखमी झाले. नगर परिषदेने ती इमारत जीर्ण झाल्याचे सांगत इमारतीचा वापर बंद करण्याची नोटीस आधीच दिलेली होती. तरीही इमारत मालक सद्रू लालानी त्या इमारतीत आपले शो-रूम सुरूच ठेवले होते. त्यामुळे शो-रूम मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार उषा चौधरी यांनी दिले आहे. ज्या बाजुची भिंत कोसळली, त्या भागात शो-रूमचे सर्व्हिस सेंटर आहे. या घटनेनंतर तहसीलदार उषा चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरमोरी नगर परिषद प्रशासनाने ही इमारत जीर्ण झाल्याचे सांगत त्याचा वापर बंद करावा आणि ती इमारत पाडावी, अशी नोटीस इमारत मालक लालानी यांना दिली होती. इमारत मालकाने नव्याने इमारत बांधण्यासाठी जवळपास वर्षभरापूर्वी नगर पंचायतकडे परवानगीही मागितली होती. मात्र परवानगी घेतल्यानंतरही प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम मात्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार करून इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने उडवले दोघींचा जागीच मृत्यू 

परभणी-गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावात देखील अशीच एक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने उडवलं. या घटनेमध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणी-गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावात घडली आहे. पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे या दोघे जणी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना अचानक एका वाहनाने दोघींना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही महिलांच्या अपघाती जाण्याने दैठणा गावावर शोककळा पसरली आहे, अपघाताबाबत पोलीस तपास करत आहेत.

आणखी वाचा