'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'एबीपी माझा'च्या न्यूजरूममध्ये अवतरली होती. ती येण्याला निमित्त होतं चॅट कॉर्नरचं. एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये आल्यानंतर तिने का धमाल केली त्याचा हा प्रातिनिधिक आढावा.

खरंतर सध्या इन्स्टा, फेसबुक, ट्विटरवर धूम आहे ती शेवंताची. तिचे अनेक मिम्स सध्या गाजतायत. रात्रीस खेळ चाले २ च्या निमित्ताने शेवंताची ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली आणि तिच्या प्रेमात मराठी रसिक बुडाला. दत्ता, माधव, पांडू या व्यक्तिरेखा मराठी टीव्ही रसिकांसाठी नव्या नव्हत्या. त्यात भर पडली ती ग्लॅमरस शेवंताची. एरवी सतत सोशल मीडियावर असणारी शेवंतासाठी आजचा दिवस खास होता कारण चॅट कॉर्नरच्या निमित्ताने ती दाखल झाली होती एबीपी माझाच्या न्यूज रूममध्ये.


न्यूजरूम मध्ये शेवंताची एट्री होती ठसकेबाज. न्यूजरूममध्ये पाठमोऱ्या असणाऱ्या एका महिलेला 'वहिनी तुम्ही कोण ?' असं विचारलं त्यावेळी आपल्या नखरेल अदांनी वळलेल्या शेवंताचा चेहरा सर्वांना दिसला आणि सगळ्यांचे श्वास रोखले गेले. अर्थातच शेवंताशी बोलायला प्रत्येजण उत्सुक होता. याची सुरूवात झाली ती तिच्या फेमपासून. तिला येणाऱ्या मिम्स आणि तिला मिळणारी लोकप्रियता आपल्याला अनपेक्षित असल्याचं तिनं सांगितलं.

न्यूजरूममधल्या अनेकांनी तिला आपल्या मनातले प्रश्न विचारले. यात तिच्यासोबत पहिला सेल्फी आणि ऑटोग्राफ कुणी घेतला?,  भूमिका कशी रंगवली? सेटवर कुणाची गट्टी कुणाशी जमली? आदी अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले. अपूर्वानेही या सगळ्या गोष्टींना मनमोकळी उत्तरं दिली. विशेष बाब अशी की अपूर्वाला या चॅट कॉर्नरमध्ये अनेक सरप्राइजेस मिळाली. यात तिच्यासाठी मिम्सची मोठाली पोस्टर्स करून घेण्यात आली होती. शिवाय या शेवटी एका केकचंही सरप्राईज होतं. या केकवर खास आण्णा नाईकांचा फोटो काढून घेण्यात आला होता. त्यानंतर तिने तो केक कापायचा होता. मग तिने तो केक कसा कापला यासाठी आपल्याला चॅट कॉर्नर पाहावं लागेल.

चॅट कॉर्नरमध्ये बोलवल्याबद्दल शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरने सर्वांचे आभार मानले. गप्पा मारतानाच अनेक सरप्राईज मिळाल्याबद्दलही तिने आनंद व्यक्त केला. इतकंच नव्हे, तर पुढच्या वेळी आण्णा नाईकांसोबत येण्याचं कबूलही केलं.

... आणि अण्णा दरडावले

खरंतर शेवंता ही अण्णांशिवाय अपूर्ण आहे. सध्या अण्णा आकेरीला असल्यामुळे ते न्यूजरूममध्ये येऊ शकले नाहीत. पण त्यांनी शेवंताला खास फोन केला. तो फोनही या कार्यक्रमात लाईव्ह होता. आपल्याला न सांगता शेवंता तिकडे मुंबईला गेलीच कशी असा प्रश्न त्यांनी बिनदिक्कत तिला विचारला. त्यावर लाडिकपणे शेवंतानेही उत्तर दिलं. इतकंच नव्हे, तर कापलेल्या केकचा एक तुकडाही त्यांच्या आठवणीत खाल्ला आणि माझाच्या न्यूजरूममध्ये एकच हशा पिकला.