Pune Crime News: राज्याचे माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचे नाव या पार्टीत आल्याने अनेक राजकीय चर्चेला ऊत आला आहे. अशातच खेवलकरांचे नाव या पूर्वीही त्याच्या आलिशान कारवरून प्रांजल खेलवलकरांचे नाव चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात काही आरोप करत हे प्रकरण लावून धरले होतं.
प्रांजल खेलवलकरांच्या आलिशान सोनाटा लिमोझिन कारवरून अनेक आरोप
एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर या पूर्वीहि एका कारणासाठी चर्चेत आले होते. यात खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच 19 एक्यू 7800 ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता.
कार अवैध असल्याचा अंजली दमानिया यांचा दावा
जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, सदर गाडीला पासिंग मिळाले आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता.