मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेचा विषय ठरलेल्या दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा (Disha Salian Case) पुन्हा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात करण्यात आला आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुरज पांचोली, दिनो मौर्या आणि मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 


दिशा सालियन हिच्या वडिलांनी या प्रकरणाचा जो नव्याने तपास करण्यात येईल, तो तपास प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यासाठी समीर वानखेडे यांना तपासाधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशी मागणी दिशाच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात समीर वानखेडे हे आदित्य ठाकरे यांची चौकशी करणार का, हे आगामी काळात पाहावे लागेल. समीर वानखेडे हे नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल विभागाचे मुंबईतील प्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळात कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकण्यात आला होता. या क्रुझवर त्या दिवशी रेव्ह पार्टी झाली होती. त्यावेळी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. याप्रकरणात आर्यन खान याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. नंतर समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप झाले होते आणि त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, आता हेच समीर वानखेडे दिशा सालियन प्रकरणात तपास करण्याची शक्यता आहे.


दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेतील 8 महत्त्वाचे मुद्दे


1. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची याचिकेतून मागणी. 


2. 8 जून 2020 रोजीचं दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे. कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते.


3. 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती यासर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसंच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे.


4. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी.


5. दिशाच्या इमारतीच्या रजिस्टरमधील 8 जूनची पानं कोणी फाडली?


6. दिशा सालियानची सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप. दिशा आणि सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू हा घातपात. दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप बाहेर का आला नाही?


7. भाजप आमदार नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपात तथ्य, असा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.


8. सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला तेव्हा इमारतीबाहेर एका मंत्र्याची गाडी होती. काही लोक त्याच्या घरी गेले होते. त्यांच्यात आणि सुशांतमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ठराविक व्यक्तीची रुग्णवाहिका आली. सुशांत सिंहच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले.



आणखी वाचा


दिशाची सामूहिक अत्याचार करुन हत्या, पालकांचा आरोप; याचिकेत आदित्य ठाकरेंचंही नाव, किशोरी पेडणेकर म्हणाल्या...