Nagpur Digital Payment Ban : नागपूर :  नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर 10मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (Digital Payment) स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशन ने हा निर्णय घेतला आहे. सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) माध्यमातून मिळवलेला पैसा विविध खात्यातून फिरून अखेरीस पेट्रोल भरण्यासाठी वापरला गेल्याच्या काही घटना विदर्भात घडल्या. त्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने आणि संबंधित बँकांनी पेट्रोल पंप मालकांचे बँक खाते गोठवले. त्यामुळे घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नसताना आणि ज्या ग्राहकाने आमच्याकडून पेट्रोल भरून डिजिटल पेमेंट केले आहे, त्याचाही त्या सायबर फसवणुकीशी कुठलाही संबंध नसताना, फक्त विविध बँक खात्यातून फिरत तो पैसा त्या ग्राहकाकडे आणि नंतर आमच्याकडे आला असल्याने आमचे खाते गोठवणे अन्यायकारक आहे, असा पेट्रोल डीलर्स असोसिएशनच म्हणणं आहे.

विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व पंपांवर डिजिटल पेमेंट घेण्यास बंद करू

सायबर पोलीस आणि बँकांच्या या अन्यायकारक कारवाईला विरोध म्हणूनच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास नकार दिले आहे. दरम्यान लवकर या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळात विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व पंपांवर डिजिटल पेमेंट घेण्यास बंद करू, असा इशाराही पेट्रोल डीलर्स असोसिएशन ने दिला आहे. सामान्य ग्राहकांनी मात्र डिजिटल पेमेंट सुरूच ठेवण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

सायबर पोलीस, बँकांच्या निर्णयाविरोधात पंपचालक आक्रमक 

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय. सद्यस्थितीत देशभरात डिझिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या