Dharashiv News : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) औचित्यनं देशभक्तीचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. असे असताना धाराशिवतील (Dharashiv) उमरगा (Omerga) तालुक्यातील तलमोड येथे एक दुदैवी घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना दारूबंदी अधिकाऱ्याला अचानक मृत्यूने गाठलं. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दारूबंदी अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. उमरगा तालुक्यातील तलमोड येथील दारूबंदी अधिकारी मोहन जाधव (वय वर्ष 55) यांचा झेंडावंदन करताना हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. ते उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. तर ते मूळचे सोलापूरचे रहिवासी होते. आज प्रजासत्ताक दिनी कर्तव्यावर असताना काळानं झडप घाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

Buldhana News : झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजवंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेच्या प्रांगणातच कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ध्वजवंदनाची तयारी सुरू असतानाच अचानक मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे मात्र उपस्थित गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Continues below advertisement

Amravati : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

घरकाम आणि भांडी घासण्याच्या मोबदल्यात 3 वर्षाच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने त्रासलेल्या आणि परिणामी संतप्त झालेल्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मात्र वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.

Amravati News : 3 वर्षाचे जमा केलेले घरकामाचे पैसे न दिल्याने संतप्त

मिळलेल्या माहितीनुसार, उषा सुधीर गोंडाणे या मागील वर्षभरापासून फ्रेझरपुरा परिसरातील बबलू ऊर्फ अमर गजानन ठाकूर यांच्या घरी भांडी घासणे आणि इतर घरी घरकाम करीत होत्या. याचदरम्यान त्यांनी भांडी घासणे, धुणे तसेच इतर घरकामाच्या मजुरीचे 4 लाख 65 हजार रुपये बाबलू ठाकूर यांच्याकडे जमा केले होते. दरम्यान, मुलीच्या लग्नासाठी हे पैसे जमा केले होते. मात्र आता मुलीचे लग्न जुळून आले असताना बाबलू ऊर्फ अमर गजानन ठाकूर हे जमा केलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करीत आहे.

याबाबत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रारीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळत नसल्याने यासाठी अखेर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी उषा गोंडाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले.

आणखी वाचा