धाराशिव : पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं आणि त्यावरुन वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक दावा केला. महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा दावा त्यांनी केला. गुजरात हे आपलेच शेजारी राज्य आहे, ते काही पाकिस्तानात नाही. त्यामुळे त्यावरून राजकारण करु नका असंही ते म्हणाले. धाराशिवमध्ये तुळजभवानीच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव जाधवांनी हे वक्तव्य केलं. 

एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' वक्तव्याचे समर्थन करताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या आधी मुंबई ही गुजरातची राजधानी असल्याचं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. 

Prataprao Jadhav On Gujarat : काय म्हणाले प्रतापराव जाधव? 

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळी होता त्यावेळी मुंबई ही गुजरातचीही राजधानी होती. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य आहे. त्यामुळे अशा गोष्टीचे राजकारण करायला नको. 

प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, "ज्या ज्या कार्यक्रमात आम्हाला बोलावलं जातं त्यावेळी आम्ही आमचा स्वाभिमान जपून त्यांचाही स्वाभिमान जागृत करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नाही.  उद्धव ठाकरेंना हा प्रश्न कुणी का विचारत नाही."

शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम 'हिंदू बांधवांनो' म्हणायचे. उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडला याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली. 

Eknath Shinde Jay Gujarat : शिंदेंकडून 'जय गुजरात'चा नारा

केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये गुजराती समाजाचा एक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची तोंडभरुन स्तुती केली. नंतर आपल्या भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात'चा नारा दिला आणि नव्या वादाला तोडं फुटलं. 

एकिकडे भाषेच्या, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन राज्यात घमासान सुरु आहे. अशा वेळी अमित शाहांच्या समोर एकनाथ शिंदे 'जय गुजरात' म्हणाले. यावरुन ठाकरेंची शिवसेना शिंदेंवर तुटून पडली. 

ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. काल एक गद्दार जय गुजरात बोलला, किती लाचारी करायची? मालकासमोर जय गुजरात बोलणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असेल का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. 

ही बातमी वाचा: