Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून अनिल गुंड या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींचा संसार उघड्यावर पडला आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या तीन चिमुकल्या आणि महिलेच्या पाठीशी पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांनी आज कुटुंबाला सांत्वन पर भेट देत मदतीचा हात पुढे केलाय .

विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

अनिल गुंड यांच्याकडे केवळ 15 गुंठे शेतजमीन होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते ट्रॅक्टर ड्रायव्हर तसेच मजुरीची कामे करत होते. मात्र, शेतात काम करत असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. मुलींना शिकवून मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. सध्या मोठी मुलगी पाचवीत, दुसरी तिसरीत आणि धाकटी मुलगी अंगणवाडीत आहे. पत्नीवर तीन मुलींच्या सांभाळाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आली आहे.  मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेण्याची आणि या कुटुंबाला एक घर बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती .यानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांच्या मागे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक उभे राहिले आहेत .गुंड कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांनी सांत्वन पर भेट घेतली .यावेळी मृत शेतकरी गुंड यांच्या पत्नीने पालकमंत्र्यांना राखी बांधली .

पाच लाखांची आर्थिक मदत, घर व पत्नीला नोकरी देण्याबाबत सूचना

विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या  कुटुंबावर आलेल्या दु:खद प्रसंगात धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक स्वतः खामसवाडी येथे जाऊन कुटुंबाला भेटले. त्यांनी भावासारखा आधार देत मृत अनिल गुंड यांच्या पत्नीच्या हातावर राखी बांधून वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, शासकीय योजनेंतर्गत घर आणि पत्नीला सरकारी नोकरी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी शिवसेना पदाधिकारी अजित पिंगळे यांनीही पुढाकार घेत मृतच्या तीन मुलींच्या नावाने प्रत्येकी 50 हजार रुपयांची एफडी (एकूण दीड लाख रुपये) करून दिली. ही रक्कम मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी वापरली जाणार आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी कुटुंबाला आश्वासन दिले की, “शासन आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर तुमच्या सोबत आहोत. सर्व शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल.” गावकऱ्यांनीही या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.