Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Dharashiv Crime : "माझी मुलगी नॅशनल चॅम्पियन कुस्तीपटू होती. १० गोल्ड मेडल होते, पूर्ण देश-देशपातळीवर खेळलेली माझी मुलगी होती आणि लग्न झाल्यानंतर सासरी सासू, सासरे, नवरा तिला त्रास देऊ लागले.

Dharashiv Crime News : तुळजापूरमध्ये असलेल्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात काल (गुरुवारी, ता ३) दुपारी धक्कादायक घटना घडली. निलंगा तालुक्यातील पौळ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी मनोहर पौळ (Ashwini Mohite Paul) या महिलेने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी घेतली. यामध्ये अश्विनी (Ashwini Mohite Paul), साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांची मुलगी क्रांती यांचा मृत्यू झाला आहे. तर अडीच वर्षाची वीरा या घटनेतून वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आता अश्विनीच्या वडिलांनी तिच्या नवऱ्यासह सासरच्यांवर गंभीर आरोप केले असून एफआयआर देखील नोंदवली आहे.(Ashwini Mohite Paul)
Dharashiv Crime : नोकरी सोडायला भाग पाडलं आणि तिन्ही मुलं...
माध्यमांशी बोलताना अश्विनीच्या वडिलांनी सांगितलं की, "माझी मुलगी नॅशनल चॅम्पियन कुस्तीपटू होती. १० गोल्ड मेडल होते, पूर्ण देश-देशपातळीवर खेळलेली माझी मुलगी होती आणि लग्न झाल्यानंतर सासरी सासू, सासरे, नवरा तिला त्रास देऊ लागले. अशा कंडिशनमध्ये सुद्धा माझी मुलगी जिद्दीने पोलीस भरती करून MSF मध्ये नोकरीला मुंबईला लागली होती. तर नोकरी सुद्धा माझ्या मुलीला करू दिली नाही, त्या जावयाने. पूर्ण पगार घेऊन तो मुलीला त्रास द्यायला चालू केला तिथे. नोकरी सोडायला भाग पाडलं आणि तिन्ही मुलं... मुलीला माझ्या एक मुलगा आणि दोन मुली आहेत. साडेपाच वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या दोन मुली आवळ्या-जावळ्या होत्या. तर या मुलींचा पूर्ण सांभाळ मीच केला. माहेरून सोनं, पाटल्या, पैसे आण, ऑटो रिक्षा घेण्यासाठी पैसे आण माहेरून म्हणून त्रास करायचा. आणि वेळोवेळी मी मुलीला सांगून, समजावून, जावयाला देखीलआल्यावर सांगून, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकला नाही.(Ashwini Mohite Paul)
Dharashiv Crime : स्वतः पगार ताब्यात घ्यायचा, पैसे घ्यायचा आणि मुलीला त्रास द्यायचा
शेवटी कंटाळून मुलीला नोकरी सोडण्यासाठी भाग पाडले त्यांनी. मुलीचा पूर्ण पगार स्वतः घ्यायचा आणि मुलीला त्रास द्यायचा मुंबईमध्ये. मग त्या लहान मुलीला आणि मुलाला मारहाण करायचा. त्या त्रासाला कंटाळून ती गावाकडे आली. २०२० ला झालेलं लग्न. लग्न झाल्यापासून त्रासच होता. मारहाण करणे, उष्ट भात खायला द्यायचे... खाताना हे खा म्हणायचं. स्वतः मटण खात बसायचं आणि तिला ताटाकडं 'बघ' म्हणायचं, ताटाकडं बघत बसायला लावायचं आणि ड्युटीवरून आली मुलगी की त्रास द्यायचा, राबवायचा, 'काम हे कर, ते कर'. ड्युटीवरून आली की त्रास द्यायचा आणि त्या पैशावर मुलीच्या पगारावर, स्वतः पगार ताब्यात घ्यायचा, पैसे घ्यायचा आणि मुलीला त्रास द्यायचा. असं करायचा मुंबईमध्ये. ती मुंबईला असताना नवरा त्रास द्यायचा आणि गावात असल्यावर सासू-सासरे हे त्रास द्यायचे. अशात हे त्रास कमी व्हावा म्हणून मी मुलीला एक म्हैस सुद्धा दिली दूधासाठी. पण ते दूध सुद्धा माझ्या मुलीला या लहान मुलांना दूध दिले नाही त्यांनी. तो जॉब सोडायला भाग पाडला. मग तो वारंवार फोन लावून त्रास द्यायचा, टॉर्चर करायचा. की 'तुला जगू देणार नाही आणि राहायला तुला यायचं असलं तर मोलकरीण म्हणून राहा माझ्यापाशी, असं असलं तर ये, असं तिला ती इथे असताना फोन करून त्रास द्यायचा', असंही अश्विनीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Dharashiv Crime : 'मला हाच नवरा असा भेटलाय तर पुढे काय'
एवढं असं असताना देखील मी विचार केला... मुलीला मी समजावून सांगायचो की, तुझे तिन्ही मुलं मी सांभाळतो आणि तू सुखात राहा. आहे त्या पगारीत तू राहा, किंवा तुला दुसरा नवरा करून देता येईल. परंतु 'मला हाच नवरा असा भेटलाय तर पुढे काय' म्हणून ती सुद्धा तयार झाली नाही आणि पुन्हा तो फोनवर सारखं टॉर्चर केल्यामुळे... सारखा फोन यायचा. आता त्या फोन रेकॉर्डमध्ये मिळेल तिचं सगळं. रात्री आम्ही तिचा नवरा, सासू, सासरा आणि नवऱ्याची आत्या या चौघांवर एफआयआर (FIR) दाखल केलेलं आहे.
मी नोकरीला असल्यामुळे सकाळी ९ ला घरातून पडलो. दररोज तिचा मुलगा सोबत माझ्या राहायचा. परंतु काल तिनं मुलाला जाऊ दिलं नाही आणि माझी पत्नी आणि माझा मुलगा पाहुण्याच्या गावाला काल सकाळी निघाले ९ ला निघाले. मग त्या मुलाला जाऊ दिले नाही तिने. तिला कारण ही प्लॅनिंग करायची होती. आणि मी ड्युटीला गेलो आणि माझी बायको पाहुण्याच्या गावाला गेल्यानंतर ११ वाजता तिने घर सोडलं असेल आणि तिन्ही मुलांना घेऊन इथे आली. ती मुलांबरोबर कुस्ती खेळायची. फडात ५-५, ६-६ कुस्त्या पाडायची. तिला अख्ख्या महाराष्ट्रात तोड नव्हती. फक्त तिचं इंटरनॅशनल... तिचं पासपोर्ट काढलेलं आहे. माझं पासपोर्ट, दुसऱ्या धाकट्या मुलीचं पासपोर्ट, अश्विनीचं पासपोर्ट काढलेलं होतं. दोन-तीन ठिकाणी तिचे इंटरनॅशनलचे चान्स चुकले. फायनलला हारली, नाहीतर इंटरनॅशनल खेळली असती, असंही पुढे अश्विनीच्या वडिलांनी म्हटलं. अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक असून त्यांना कुस्तीची फार आवड आहे. त्यांनी लहानपणापासून अश्विनीला कुस्तीचे धडे दिले होते. तिची कुस्तीची जिद्द पाहून वडिलांनी घरीच कुस्तीची तालीम तयार केली होती. अश्विनीचे वडील तानाजी मोहिते यांनी मुलीच्या मृत्यूस पती व सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. पतीकडून तिला नेहमी त्रास दिला जात त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलीस कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Dharashiv Crime : कुस्ती क्षेत्रात 'महाराष्ट्राची वाघीण' म्हणून ओळख
अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, तिला कुस्ती क्षेत्रात 'महाराष्ट्राची वाघीण' म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. मात्र मुलांना घेऊन आत्महत्येचं टोकाचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता सदर घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. (Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv)
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















