धाराशिव : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. या पाहणी संदर्भात अजित पवार यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. आज सकाळी करमाळा तालुक्यातून सुरुवात केली. करमाळा, माढा, मोहोळ, तुळजापूर, भूम, परंडा अशा पद्धतीनं दौरा केला, असं त्यांनी सांगितलं. उद्या बीड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहे, असं अजित पवार म्हणाले. अनेक वर्ष राजकीय जीवनात काम करतोय. या गोष्टीला 35 वर्ष होत आली आहेत. भूकंपासारखं संकट पाहिलं आहे. मी किल्लारीचा भूकंप पाहिला, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना दुष्काळ ही पाहिला. कोकणात वादळी वारं येतं त्याचा खूप फटका बसतो हे आपण पाहिलं. परंतु अवर्षण प्रवण भाग आहे नेमक्या अशाच भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. सीना नदी, मांजरा नदी, सिंदफणा नदी, गोदावरी नदी या नद्यांना जोडणाऱ्या उपनद्या दुथडीभरुन वाहत आहेत. प्री कॅचमेंट एरियात पाऊस होता, धरणक्षेत्रात पाऊस होता त्यामुळं पाणी सोडण्यात आलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Ajit Pawar on Maharashtra Flood प्रचंड नुकसान झालंय : अजित पवार
नदी काठ, ओढे, नाले याच्या बाजूला असणाऱ्या जमिनींचं नुकसान झालंय आहे. काहीबाबतीत ओढे नाले पूर्वीच्या काळा पेक्षा लहान होत गेले हे कारण आहे. काही ठिकाणी नद्यांनी पात्र बदललं, अशा प्रकारे परिस्थिती पाहायला मिळाली. मोठे पूल असताना त्यामध्ये पाणी बसलं नाही, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाला पाणी लागलं होतं. जड वाहनं बंद केली होती. घरांचं नुकसान झालंय, विहिरींचं, सर्व प्रकराच्या पिकांचं, रस्त्यांचं, पुलांचं, केटीवेअरचं नुकसान झालंय. जनावरं मृत्यूमुखी पडली. पूल राहिला आणि दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले अशी स्थिती आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता : अजित पवार
हवामान खात्यानं असं सांगितलंय, पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७, २८, २९, ३० या चार दिवसात अतिवृष्टी होऊ शकते. ती पण काळजी सर्वांना घ्यावी लागेल. असं अजित पवार म्हणाले.
यंत्रणा देखील राबतेय, सतत पाऊस असल्यानं एअरलिफ्ट करावं लागतंय, एनडीआरएफची टीम जातेय, आर्मीची टीम राबतेय, यंत्रणा अडचणीतील माणसांना दिलासा देण्याचं काम सुरु आहे. उद्यापासून पंचनामे जास्त गतीनं सुरु होतील, असं अजित पवार म्हणाले.
पावसामुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे व्यवस्थित करा, संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी जे काही करायला लागेल ता करा, अशा सूचना दिल्याचं अजित पवार म्हणाले. पंचनामे झाल्यानंतर आपल्यापुढं आकडे येतील, किती लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय, किती नुकसान झालंय याची आकडेवारी येईल. आम्ही केंद्राची मदत मिळवणार आहोत. संकटात राज्याला केंद्राचा हातभार लागला तर मदत होते, असं अजित पवार यांनी म्हटलं.
काही ठिकाणी माती खरडून गेलीय, ती जमीन पुन्हा कसण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. आमचा प्रयत्न दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. आम्ही सगळे फिल्डवर आहोत, पाहणी सुरू आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून आम्ही या पाहणी बाबत चर्चा करू, असं अजित पवार यांनी म्हटलं. शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे त्याला जगवण्याचे प्रयत्न सर्वांनीच करावे, राजकारण कोणी आणू नये, असंही त्यांनी म्हटलं.