नागपूर : जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज 200 च्या वर कोरोना पॉझिटिव्ह संख्या येत आहे. ही संख्या वाढत राहिल्यास पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी स्वतःचा पहिला,दुसरा व प्रिकॉशनरी तिसरा (बुस्टर ) डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर.विमला व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या संदर्भातील आवाहन करण्यात आले आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन (बुस्टर) डोस मोफत देण्यात येणार आहे. हा बुस्टरडोज ज्या नागरिकांनी आपला दुसरा डोस घेतला आहे. ज्याला सहा महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी झाला आहे, अशांना देण्यात येणार आहे, कोरोना पुन्हा डोके वर काढतो की काय अशा पद्धतीची आकडेवारी जिल्ह्यामध्ये अहवालात दररोज येत आहेत. त्यामुळे या डोसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


पुढील काही दिवसात वेगवेगळ्या सण उत्सवाची सुरुवात होणार आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत या उत्सवादरम्यान अनेक ठिकाणी स्टॉल लावले जाणार आहे. काही विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. गणेश मंडळाची देखील यासाठी मदत घेतली जाणार आहे. केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व मनपा आरोग्य यंत्रणेचा दर आठवड्याला मोहिमेबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


काळजी घ्या, स्वतःचीही आणि इतरांचीही


अनेक ठिकाणी नागरिकांनी पुन्हा बेपर्वा वागणे सुरू केले असून कोरोना पासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे व्हॅक्सिनेशन अर्थात लसीकरण आहे. त्यामुळे शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे पहिला दुसरा व बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर देखील आवश्यक आहे. शासनाने याबाबत सक्ती करण्यापूर्वीच नागरिकांनी जागरूक होऊन जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे, आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांना आपल्या आई-वडिलांना हा डोस देण्यासाठी शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, आपल्या घरातील प्रत्येकाचे व्हॅक्सिनेशन झाले अथवा नाही यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जागरूकतेने मोहिमेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पालकांना सांगावे, तसेच पालकांनी देखील आपल्या 14 वर्षावरील मुलांना त्यांचा डोस देऊन सुरक्षित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.